१ फेब्रुवारी १९८१ रोजी मेलबर्नला झालेल्या त्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडला सामना बरोबरीत सोडवण्यासाठी (टाय) शेवटच्या चेंडूवर सहा धावा हव्या होत्या. यजमान ऑस्ट्रेलियाचे कर्णधार होते ग्रेग चॅपेल. त्यांनी आपल्या धाकटय़ा भावाला- ट्रेव्हर चॅपेल यांना- ‘अंडरआर्म’ चेंडू टाकायला सांगितला. त्या वेळेपर्यंत तरी असा चेंडू विधिनिषिद्ध नव्हता, पण ती कृती खिलाडू वृत्तीच्या पूर्णपणे विपरीत होती. चॅपेल यांच्यावर त्या वेळी आणि नंतरही प्रचंड टीका झाली. त्या सगळय़ाच प्रकाराबद्दल मैदानावर सर्वाधिक नापसंती, नाराजी जी व्यक्ती दाखवत होती, तिचे नाव रॉडनी मार्श. ऑस्ट्रेलियाचे हे विख्यात यष्टिरक्षक त्या संपूर्ण प्रकाराबद्दल अजिबात समाधानी नव्हते. त्यांनी सुरुवातीलाच असे काही करण्यापासून ग्रेग चॅपेलना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. रॉडनी मार्श यांचे ते रूप आजही असंख्य क्रिकेटरसिकांच्या मनात आहे. मनगटापर्यंत ओढलेल्या टी-शर्टच्या बाह्या, त्या टी-शर्टची छातीपर्यंतची सारी बटणे उघडलेली, क्रिकेटपटूंच्या छबीशी जरा विसंगत असे सुटलेले पोट, झुपकेदार मिश्या आणि मैदानावर वाघासारखा वावर नि जरब. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज ज्या वेळी क्रिकेटमधील दोन महासत्ता होत्या आणि परस्परांशी टक्कर घेत होत्या, त्या काळात- म्हणजे १९७०च्या दशकात आणि १९८०च्या सुरुवातीला मार्श ऑस्ट्रेलियाचे यष्टिरक्षक होते. हल्ली यष्टिरक्षकांचे फलंदाजीतील कौशल्य प्रथम पाहिले जाते आणि मग यष्टिरक्षकत्व ‘बहाल’ केले जाते. त्या यष्टिरक्षक-फलंदाज परंपरेतील मार्श हे आद्यगुरू. पण फलंदाजीत सुरुवातीला हुनर दाखवल्यानंतर त्यांनी केवळ यष्टिरक्षणावर लक्ष केंद्रित केले हा फरक. त्यांचे काम सोपे नव्हतेच. डेनिस लिली, जेफ थॉम्सन, लॅनी पास्को अशा तेज गोलंदाजांसमोर यष्टिरक्षण करताना, यष्टींपासून किती मागे उभे राहायचे हे ठरवावे लागे. मार्श यांचा याबाबतचा अंदाज नेहमीच अचूक ठरायचा. डेनिस लिली यांच्याबरोबर त्यांची जोडी विशेष गाजली. कसोटी क्रिकेटमध्ये ‘.. झेल मार्श गोलंदाजी लिली’ हा धावफलक तपशील विक्रमी ९५ वेळा या जोडीने नोंदवला. दोघेही पश्चिम ऑस्ट्रेलियाचे. दोघांनीही ३५५ बळी घेतले, जे गोलंदाजी आणि यष्टिरक्षणामध्ये त्या वेळचे विक्रम होते! रॉडनी मार्श ९६ कसोटी सामने आणि ९२ एकदिवसीय सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावलेले ते पहिले ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक. १९७९ विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचे टोनी ग्रेग यांचा झेल मार्श यांनी, उजवीकडे स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेले इयन चॅपेल यांच्याही उजवीकडे झेपावून घेतला! मार्श यांची ही आणखी एक सुपरिचित छबी. इयन व ग्रेग या दोन्ही कर्णधार बंधूंना मैदानात सुनावणारे स्पष्टवक्ते ही मार्श यांची ओळख. एकदा सामनेनिश्चितीविषयी जाहीर कबुली देऊन बदनामही झाले. पण निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकादमी, इंग्लिश क्रिकेट अकादमी यांचे समर्थ परिचालन करून मार्श यांनी त्यांच्यातील अस्सल मार्गदर्शक-प्रशिक्षकाचीही चुणूक दाखवली. नव्वदच्या काळातील दिग्विजयी ऑस्ट्रेलियन संघातील अनेक उत्तम क्रिकेटपटूंना मार्श यांनी सुरुवातीच्या काळात घडवले. गेल्या आठवडय़ात ७४व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले आणि काही तासांनीच शेन वॉर्न याने जगाचा निरोप घेतला. जगभरातील असंख्य क्रिकेटरसिकांना वॉर्नइतकाच मार्श यांचा मृत्यूही खिन्न करून गेला.
रॉडनी मार्श
सगळय़ाच प्रकाराबद्दल मैदानावर सर्वाधिक नापसंती, नाराजी जी व्यक्ती दाखवत होती, तिचे नाव रॉडनी मार्श.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 10-03-2022 at 00:24 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Profile rodney marsh akp