‘भारतीय जाहिरात क्षेत्रातील पहिली महिला’ असा त्यांचा उल्लेख होई तेव्हा अनेक जण सावध प्रतिक्रिया देत : ‘‘या क्षेत्रात तारा सिन्हा आल्या त्या साधारण १९५४ साली.. त्यांच्याआधी कुणीच नव्हत्या? पाहावे लागेल..’’ असा साधारण सूर या सावधगिरीमागे असे. पण आपल्या देशात स्वत:ची जाहिरात संस्था स्थापणारी पहिली महिला कोण, या प्रश्नाचे निर्विवाद उत्तर एकच : तारा सिन्हा! त्यांची निधनवार्ता बुधवारी आली, तेव्हा एक धडाडीचे व्यक्तिमत्त्व लोपले, अशीच सर्वसाधारण प्रतिक्रिया होती. ही धडाडी कुठून आली, याला नेमके उत्तर नाही. धनबादमधील चिरंजीवलाल आणि सीता पसरिचा या सुखवस्तू दाम्पत्याची कन्या तारा ही विशीच्या उंबरठय़ावर असताना इंग्लंडमध्ये जाहिरात व जनसंपर्क पदविकेचे शिक्षण घेण्यासाठी जाते, हीदेखील धडाडीच. आईवडिलांनी त्या वेळी आधार दिल्यामुळे तारा १९५४ साली डी. जे. केमर या जाहिरात कंपनीत नोकरीनिमित्त कोलकात्यासही गेल्या. परंतु वर्षभरातच या कंपनीने भारतातील कारभार गुंडाळण्याचे ठरविले, तेव्हा तारा आणि सहकाऱ्यांनीही निर्णय घेतला : भागीदारीत जाहिरात कंपनी स्थापण्याचा.. तिचे नाव ‘क्लॅरियन’. तारा या कंपनीच्या संचालक झाल्या.. वयाच्या २३ व्या वर्षी! पण ही तारा यांची ‘स्वत:ची’ कंपनी नव्हे. तो क्षण बराच नंतर आला. त्याआधी त्यांना अमेरिकेत कामाचा अनुभव मिळणार होता. चांगली संधी म्हणून १९७३ साली ‘कोका कोला एक्स्पोर्ट कॉपरेरेशन’च्या भारतातील कार्यालयात तारा रुजू झाल्या; पण ‘जनता’ सरकारने १९७७ साली या अमेरिकी पेयावर बंदी घातली. ‘कोक’च्या अमेरिकी कंपनीने, तारा यांच्यासह काही वरिष्ठांना अमेरिकेत काम करण्याचा प्रस्ताव दिला. तो स्वीकारून तारा अॅटलांटा येथे गेल्या. तेथील कामाने आपणास आंतरराष्ट्रीय अनुभव दिला, असे त्या आवर्जून सांगत; पण १९८४-८५ साली त्या पुन्हा ‘क्लॅरियन’मध्ये परतल्या. तेथे पटेनासे झाल्यामुळे कंपनीने त्यांना कामावरून दूर केले. पण तारा यांनी जोडलेला ग्राहकवर्ग (जाहिरातीची कामे देणाऱ्या कंपन्या) त्यांच्याचकडे राहिला. त्यांनी दिल्लीत ‘तारा सिन्हा असोसिएट्स’ या कंपनीची स्थापना केली. जाहिराती म्हटले की अलेक पदमसी ते प्रसून पांडेपर्यंतच्या जाहिरातकारांची नावे आठवतात, त्यात तारा यांचे नाव नसते; कारण तारा यांचे कार्यक्षेत्र सृजनशील नव्हते. तारा या जाहिरात व्यवस्थापन क्षेत्रात कर्तबगार होत्या. उत्पादकांना योग्य सल्ला देणे, कोणत्या माध्यमांतून कशी जाहिरात केल्यास परिणामकारकता वाढेल हे ठरविणे, आदी कामांसाठी त्या ओळखल्या जात. वयपरत्वे त्या कामापासून दूर गेल्या आणि गेले सहा महिने त्या आजारीच असत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा