अमेरिकी आणि ब्रिटिश लगदा मासिकांनी दोन महायुद्धांदरम्यान आफ्रिकी जंगलांतील साहसमालांची वाचकांना सवय लावली. एडगर राईस बरोज यांचा टारझन आणि त्याच्या धाडसमालिका या त्यापैकी आद्य. पण साहसकथा लेखकांना आफ्रिकी भूमी ही नंतर कच्च्या मालासारखी उपयोगात आली. मराठीमध्ये विजय देवधरांनी या आफ्रिकी जंगलांतील अजब-सुरस कहाण्यांचा सागरच अनुवादाद्वारे उपलब्ध करून दिला आहे. ‘द ग्रेट रेल्वे बझार’ लिहिणाऱ्या पॉल थेरॉ या मुख्य धारेतील अमेरिकी लेखकानेही बऱ्याच आफ्रिकी अनुभवाच्या कथा गाजविल्या. पण सातत्याने खूपविक्या यादींत आपल्या जाडजूड जंगल धाडसांच्या मोहिमा राखणारे विल्बर स्मिथ हे दक्षिण आफ्रिकेतील बहुधा सर्वात जगप्रिय लेखक मानावे लागतील. ऐंशीच्या दशकात भारतात नवआंग्ल वाचकांची एक पिढी तयार झाली, त्या पिढीवर स्टीव्हन किंग या लेखकाच्या कादंबऱ्यांनी गारूड केले. त्यामुळे विल्बर स्मिथचे कादंबरी ठोकळे आपल्याकडे प्रेमाने वाचणारे कमी असून आपल्याकडे हा लेखक म्हणावा तितका परिचित नाही. त्याचे एक कारण त्यांच्या कादंबऱ्यांवर केवळ दोनच चित्रपट आले आहेत, तेही ज्याची दखल भारतातून घेतली जाणे अवघड होते, त्या काळात. पण भारतेतर जगात या लेखकाची पुस्तके पारायणे करणारे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या साहस कादंबऱ्यांच्या हार्डबाऊंड आवृत्त्यांचे हस्तांतरण होण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहेत. १९३३ साली झांबियात जन्मलेल्या विल्बर स्मिथ यांच्या घरातली आर्थिक समृद्धी २० हजार एकरांहून अधिक एवढ्या जमिनीच्या मालकीतूनच सिद्ध होणारी. खेळण्यातल्या बंदुकीत मश्गुल होण्याच्या वयात, आठव्या वर्षी त्याच्या आजोबांनी त्याच्या हाती खरे गोळीयंत्र सुपूर्द केले. चौदाव्या वर्षी पहिल्या सिंहाची शिकार वगैरेचा अनुभव, विमान चालविण्याचा शौक आणि स्कुबा डायव्हिंगचा छंद जोपासताना त्यांच्या लेखणीलाही धार आली. घरातील वातावरण साहस प्रोत्साहनाचे असताना त्याच्या आईने त्याला ग्रंथवाचनाची गोडी लावली. मग आपल्या साहसांच्या खऱ्या घटनांना अधिक कल्पनांचे अस्तर चढवत स्मिथ यांच्या कादंबऱ्यांची फॅक्टरी सुरू झाली. १९६४ साली त्याची ‘व्हेन द लायन्स फीड’ ही पहिली कादंबरी आली. दक्षिण आफ्रिकेत प्रचंड शेतपसारा असलेल्या तरुणावरच्या कादंबरीने खपाचे विक्रम केले. मग याच नायकाच्या कुटुंबाचा दोनशे वर्षांचा इतिहास ‘रचून’ -म्हणजे त्यात कल्पित मिसळून- सांगणाऱ्या १५ कादंबऱ्यांची मालाच आली. बरोज यांचा टारझन जर शहरात जन्मून, शिकून-सवरून तिथल्या संस्कृतीत आत्मसंरक्षणाचे आडाखे शिकून मग जंगलातील साहसांत कसा रमला असता, हे स्मिथ यांच्या बहुतांश कथानकांतून दिसते. त्याच्या ४९ कादंबऱ्यांचे ३० हून अधिक भाषांतील अनुवाद होणे, वाचकांना साहसकथा किती आवडतात हे दर्शविणारे. आफ्रिकेतील वसाहतवादी कालखंड, अमेरिकेतील यादवी युद्धाच्या खुणा, रशियातील दुर्गम भागांचा इतिहास, इजिप्तमधील अपरिचित प्रदेश त्याने कादंबऱ्यांत साहसशेती करण्यासाठी वापरले. इतकेच नाही, तर साहसकथांमध्ये वाचकांनी गुंतून राहावे, यासाठी विल्बर अॅण्ड निसो फाऊंडेशन ही वाचनप्रसाराची संस्था काढली. साहसकथांना प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था विविध उपक्रम आखते.
गेल्या आठवड्यात या लेखकाचे निधन झाले, तरी ही संस्था त्याच्या ४९ कादंबऱ्यांचाच नाही, तर कुठे तरी वाचनात आखडत चाललेल्या साहसकथांचा प्रवाह पुनर्जीवित करण्यात तीव्रतेने सक्रिय राहील!