झोपेचे महत्त्व ती ज्यांना येत नाही त्यांनाच समजते. झोप न येणारा माणूस दिवसा डोक्यात घण बसत असल्यासारखा हताश असतो. अशा रुग्णांना मग झोपेची औषधे वरदान वाटू लागतात. अर्थात त्यांचे सेवन हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे, तसे केले तरीही त्यांची सवय लागल्याशिवाय राहत नाही. झोपेवर व त्यासाठीच्या औषधांवर आतापर्यंत बरेच संशोधन झाले असले तरी ते पुरेसे नाही. याच संशोधन कार्यातील एक वाटसरू आणि प्रत्यक्ष उपचार करणारे डॉक्टर ख्रिस्तियन गिलमिनॉल्ट यांचे नुकतेच निधन झाले.
सहकाऱ्यांना ‘सीजी’ नावाने परिचित असलेल्या गिलमिनॉल्ट यांनी झोपेच्या आजाराचे वर्गीकरण करण्याचे मोठे काम केले. श्वसनातील अनियमितता ही निद्रानाशास कारण ठरते हे त्यांनी दाखवून दिले. यासंदर्भातील ‘ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया’ हा शब्दप्रयोगही त्यांचाच. स्टॅनफर्ड विद्यापीठात १९७२ पासून ते झोपेशी संबंधित आजारांवर क्लिनिक चालवत होते. इटलीतील निद्राशास्त्रज्ञ एलिओ ल्युगारसी यांच्या संशोधनाशी परिचय झाल्यानंतर ते या विषयाकडे वळले. गिलमिनॉल्ट यांनी हृदयविकारतज्ज्ञ जॉन श्रोडर व अॅरा तिलकियन यांना त्यांच्या झोपेच्या क्लिनिकमध्ये थांबून या रुग्णांच्या हृदयाच्या अवस्थेचा अभ्यास करण्यास सांगितले होते. झोपमोडीस महत्त्वाचे कारण असलेल्या श्वसनदोषांवर त्यांनी ट्रॅकिओस्टॉमीचा उपचार सुरू करून अनेक रुग्णांत बदल घडवून आणले. हृदयाचे कार्य बिघडले तरी झोपेचे चक्र बिघडते. डॉ. विल्यम सी डेमेंट यांच्याबरोबर काम करताना त्यांनी अॅप्निया व हायपोनिया इंडेक्स यांचा संबंध प्रस्थापित केला होता. निद्रासंशोधन हेच कार्यक्षेत्र मानणाऱ्या गिलमिनॉल्ट यांनी एकूण ७४३ संशोधन निबंध लिहिले होते. ‘असोसिएशन ऑफ स्लीप डिसऑर्डर्स’ या संस्थेचे ते एक संस्थापक तर स्लीप या नियतकालिकाचे पहिले संपादक. मार्सेली येथे जन्मलेल्या गिलमिनॉल्ट यांचे शिक्षण पॅरिस विद्यापीठात झाले. १९७२ मध्ये ते स्टॅनफर्ड येथे अभ्यागत प्राध्यापक झाले. तेथील निद्रा केंद्रात त्यांनी बरेच संशोधन केले. दिवसा जास्त झोपाळल्यासारखे वाटण्याने रात्री झोप येत नाही, असाही ठोकताळा त्यांनी सांगितला होता. झोप हा मेंदूशी संबंधित परिणाम आहे असे त्यांचे मत होते. ते अतिशय सहवेदनशील होते त्यामुळेच रुग्णांना काय वाटते आहे याला त्यांनी जास्त महत्त्व दिले. सहृदयतेबरोबरच त्यांची विनोदबुद्धीही तल्लख होती. त्यामुळे त्यांच्यासह काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना कधीच दडपण आले नाही. त्यांच्या निधनाने, निद्रानाशाच्या रुग्णांना दिलासा देणारा संशोधक निमाला आहे.