रोज सकाळी बरोबर सात वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणीवर एक विशिष्ट आवाज ऐकायची सवय साऱ्या महाराष्ट्राला होती, तेव्हा सुधा नरवणे हे नाव घरोघरी सतत चर्चेत असे. बातमी सांगणाऱ्याने तिच्यात गुंतायचे नसते आणि त्या बातमीशी आपला कसलाही थेट संबंध नसतो, हे ठसवण्यासाठी असेल किंवा स्वभावत:च असेल, पण प्रत्येक बातमी तटस्थपणे सांगणारा सुधा नरवणे यांचा आवाज अनेक वर्षे सकाळीच ऐकला जात असे. माध्यमांची भाऊगर्दी नव्हती आणि आकाशवाणी हेच जगण्याचे घडय़ाळ होते, असा तो काळ. ‘सुधा नरवणे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे’ या वाक्याबरोबर घराघरातले रेडिओ दैनंदिन कामकाजाची सूचना देत असत. वृत्तपत्रे छपाईसाठी गेल्यानंतर रात्री उशिरा घडलेल्या घटनांची नोंद हे प्रादेशिक बातम्यांचे वार्तापत्र हमखास घेत असे. त्यात कुणाचे निधन, कुठे झालेला भूकंप यांसारख्या बातम्या असत. दुसऱ्या दिवशी दाराशी वृत्तपत्र येईपर्यंतचा काळ सुधा नरवणे यांनी सांगितलेल्या बातमीवर चर्चा करण्यात जाई.
एरवी सहजपणे समूहात मिसळण्याचा, गप्पाटप्पा करण्याचा सुधाताईंचा स्वभाव नव्हता. पहाटे पाच वाजता, रोज आकाशवाणीच्या पुणे केंद्रात न चुकता हजर राहणाऱ्या बाईंना तेथील अन्य सहकारी जरासे टरकूनच असत. त्याचे मुख्य कारण त्यांच्यातील कमालीची शिस्त. बिनचूक राहण्यासाठीचा प्रयत्न. भाषेवरील प्रभुत्व आणि आवाजात अलिप्त राहण्याचे असलेले सामर्थ्य. बातमीपत्र वाचत असताना, मध्येच ताजी बातमी सांगण्यासाठी सहकारी स्टुडिओत आले, तरीही जराही न डगमगता, क्षणभर समोरचा फीडर बंद करून बातमीची मनातल्या मनात जुळवाजुळव करून ती न अडखळता सांगता येणे, ही त्या क्षणाची खरी कसोटी असते. सुधाताई त्याला सतत यशस्वीपणे सामोऱ्या गेल्या. केवळ आवाज हीच त्यांची ओळख राहिली आणि त्याच्या आधारे समाजात त्यांना ‘सेलेब्रिटी’ होता आले.
त्या काळात नावाजलेल्या सत्यकथा, किलरेस्कर, माणूस, हंस यांसारख्या नियतकालिकांमधून सुधाताईंनी लेखन केले. ललित लेखनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी महत्त्वाचीच होती. कथा, कादंबरी, अनुवाद अशा साहित्यातील अनेक प्रांतांत त्यांनी मुशाफिरी केली. त्या लेखनातून दिसणारा भावनांचा ओलावा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील न समजलेले वैशिष्टय़ होते. सुस्पष्ट वाणी हा नभोवाणीवर काम करणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यावश्यक गुण होता. पण तेवढय़ाने भागणारे नसते. त्याच्या ताकदीचे सुधाताईंना सतत भान असे. त्यामुळे आज इतक्या वर्षांनंतरही सुधा नरवणे आणि बातम्या हे समीकरण मराठी जनांच्या मनात टिकून आहे. त्यांच्या निधनाबद्दल प्रत्येकाच्या मनात त्यामुळेच हळहळ आहे.