सायकलवरून २९ हजार किलोमीटरचे अंतर १५९ दिवसांत एकटय़ाने पार करत जगप्रदक्षिणा करणारी वीस वर्षांची वेदांगी कुलकर्णी म्हणजे साहसवेडाचे प्रतीकच; पण तिचे हे साहस केवळ साहसासाठी साहस नाही. छंद आणि स्पर्धाच्या पलीकडे जात स्वत:ला अजमावणारे, शारीरिक- मानसिक क्षमतांचा कस लागणारे आव्हान स्वीकारले, की करावी लागणारी धडपड पूर्णत: वेगळी असते. वेदांगीने हे आव्हान स्वीकारले आणि पूर्णत्वाला नेले.
पनवेल येथे सुरू झालेले तिचे शालेय शिक्षण पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीतून पूर्ण झाले. त्यानंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतला असला तरी लहानपणापासूनची फुटबॉलची साथ सुटली नाही. फुटबॉल प्रशिक्षकाचा ‘डी’ परवाना तिने मिळवला. बारावीत असताना युथ होस्टेलच्या हिमाचलमधील दोन उपक्रमांमुळे तिची सायकलिंगशी ओळख झाली. त्यातून तिला सायकलिंगचे वेडच लागले. दोन महिन्यांच्या अंतराने तिने मनाली ते लेह या मार्गावर सायकलिंगदेखील केले. क्रीडा क्षेत्रातच करिअर करायचे असल्याने बोर्नमाऊथ विद्यापीठात (इंग्लंड) क्रीडा व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. लंडन-एडिंबरा-लंडन ही प्रसिद्ध सायकल स्पर्धा तिला दुखापतीमुळे पूर्ण करता आली नाही. मात्र नंतर तिने एकटीनेच त्याच मार्गावर सायकलिंग पूर्ण केले.
या सर्वाची परिणती सायकलवरून जगप्रदक्षिणेत झाली. गिनीजच्या नियमानुसार सायकलवरून जगप्रदक्षिणा करताना २९ हजार किमी (विषुववृत्तावरील भूभागाएवढे) अंतर पूर्ण करावे लागते. ऑस्ट्रेलियातून सायकलिंग सुरू केल्यावर न्यूझीलंड, कॅनडा, ग्रीनलँड, स्पेन, फिनलँड, रशिया आणि भारत अशा चौदा देशांमध्ये तिने सायकल चालवली. नवीन प्रदेश, भाषेची अडचण, राहण्याखाण्यातले वेगळेपण आणि व्हिसा प्रक्रियेची पूर्तता हे सारं तिचं तिनेच सांभाळलं. स्पेनमध्ये तिच्यावर चाकूहल्ला झाला, पैसे लुटले गेले. आइसलँडमध्ये ती हिमवादळातही सापडली. पण जिद्द सोडली नाही. विशेष म्हणजे तिची ही जगप्रदक्षिणा शिक्षण सुरू असतानाच झाली आहे. अभ्यासक्रमात तर खंड पडला नाहीच, उलट विद्यापीठाने तिला अनेक पातळीवर सर्वतोपरी मदत केली. वेदांगीच्या आई-वडिलांचा तिच्या या संपूर्ण उपक्रमाला दिलेला पाठिंबा सर्वात महत्त्वाचा आहे; मोहिमेचा मोठा आर्थिक भार तर त्यांनी पेललाच आहे, पण तिच्यासाठी ते मोठा मानसिक आधारदेखील होते. ‘हे करू नको’ असे तिला कोणीही सांगितले नाही हे महत्त्वाचे. एकूणच मराठी मध्यमवर्गीय पठडीबद्ध करिअरच्या मानसिकतेच्या बाहेर जाऊन केलेली वेदांगीची ही धडपड म्हणूनच उल्लेखनीय आणि प्रेरणादायी ठरणारी आहे.