फाळणीपूर्वीच्या अखंड पंजाबात जन्म झाला असूनही, फाळणीऐवजी ‘परिस्थिती’ हा माणसाला छळणारा घटक मानून मोहन भंडारी कथालेखन करीत राहिले. ही ‘परिस्थिती’ आर्थिक, सामाजिक आणि भावनिकसुद्धा असते, ती माणसाला अतृप्त ठेवते.. पण या अतृप्तीतही माणूसपणा जागा राहातोच, असा विश्वास त्यांच्या कथांनी दिला! २६ नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाले, तरी हा विश्वास त्यांच्या कथांमधून अदम्यच राहील. ‘अध्वाता’ ही पहिली कथा, इयत्ता नववीत असताना मोहन भंडारींनी लिहिली होती. घरात वाचनाचे संस्कार फारसे नव्हते. वडील गांजेकस, फिरते विक्रेते म्हणूनच चरितार्थ चालवणारे. फाळणीनंतर अनेक पंजाबी कुटुंबांना ज्या अंधाऱ्या भवितव्याचा, अनिश्चिततेचा सामना करावा लागला, त्या स्थितीतून मोहन भंडारी आणि त्यांचे दोघे भाऊ बालपणीच गेले होते. गोष्टी सांगायच्या त्या इतरांच्या, आणि त्या परदु:खातून स्वत:चे जिणे सुखाचे मानत राहायचे, हा संस्कार त्यांनी प्रेमचंदांकडून स्वीकारला की कुणा परदेशी लेखकाकडून? त्यांना विचारले तर कुणाचेच नाव न घेता, ‘लोककथांमधून’ एवढेच उत्तर मिळे!  ‘कथा अवखळ लहानग्या मुलीसारखी असते, ती लपाछपी खेळते, तुमच्याकडे येतच नाही, अबोला धरते.. तिला तुम्ही वळण लावायचे असते’ असा कानमंत्र मात्र ते अवश्य देत. लोककथा, लोकगीते यांचा संग्रह वडिलांच्या खेडोपाडी फिरस्तीमुळे मोहन यांच्याकडे बालपणीच वाढला होता, पण स्वातंत्र्यानंतरच्या ‘आधुनिकतावादी अभिव्यक्तीच्या दशका’मध्ये आपण लिहितो आहोत, याचे भानही त्यांच्याकडे आपसूक होते. ‘ग्रामीण कथा’असा शिक्का त्यांच्या कथेवर कधी बसला नाही. शिक्का बसला तो ‘साहित्य अकादमी पुरस्कार (१९९८) प्राप्त कथाकार’ एवढाच; पण २०१५ मध्ये तोही त्यांनी पुसून काढला.. निमित्त अर्थातच अभिव्यक्तीवरल्या दबावाचे.  तथाकथित ‘पुरस्कार वापसी गँग’मधले कथाकार, असा नवा शिक्का वयाच्या ७८ व्या वर्षी मारला जाईल याची अजिबात तमा त्यांना कशी काय नव्हती, याचेही उत्तर त्यांच्या कथाच देतात. त्या वाचल्यास, ‘यांचे भारतमातेशी काय नाते?’ वगैरे प्रश्न विचारण्याचा अभिनिवेश नक्कीच कमी होईल, कारण मातीशी नाते जोडायचे तर मातीतला माणूस समजून घ्यावा लागतो, हे सूत्र त्यांच्या कथांतून उलगडत जाईल. स्वत:च्या साहित्याची हिंदी व उर्दू भाषांतरे त्यांनी केली, पण १५ पुस्तके पंजाबीतच राहिली. बाकी ते तिसव्या वर्षी एलएलबी आणि नंतर एमए झाले, ही ‘परिस्थिती’शी त्यांच्या व्यक्तिगत झगडय़ाची कथा.  तीही ‘मोहन भंडारी हाजर है’ (२०१३)  या पंजाबी संस्मरणात आहेच. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा