वर्षभरापूर्वीची ही गोष्ट. आइल ऑफ मान येथील एका बुद्धिबळ स्पर्धेत आर. प्रज्ञानंद हा भारताचा ११ वर्षीय बुद्धिबळपटू खेळत होता. एका फेरीत त्याच्या समोर होता इंग्लंडचा डेव्हिड हॉवेल. हॉवेलचे गुणांकन त्या वेळी २७००च्या वर होते. म्हणजे अतिशय मातब्बर बुद्धिबळपटू. लहानग्या प्रज्ञानंदने हॉवेलचा सहज धुव्वा उडवला. त्या वेळी उपस्थित एका ब्रिटिश पत्रकार/बुद्धिबळपटूने बातमी पाठवली : नावही उच्चारता येणार नाही असा एक भारतीय बुद्धिबळपटू येथे धुमाकूळ घालतोय. या मुलावर लक्ष ठेवावे लागेल!
रमेशबाबू प्रज्ञानंद हा भविष्यात विश्वनाथन आनंदप्रमाणे दबदबा निर्माण करू शकेल असा बुद्धिबळपटू आहे. इटलीतील एका स्पर्धेत खेळताना त्याने तिसऱ्या आणि अंतिम ग्रॅण्डमास्टर नॉर्मसाठी आवश्यक कामगिरी केली आणि १२ वर्षे, १० महिने, १३ दिवस या वयात तो जगातला दुसरा सर्वात युवा ग्रॅण्डमास्टर बनला. सर्वात युवा ग्रॅण्डमास्टर बनण्याचा मान सध्या रशियाकडून खेळणाऱ्या पण त्या वेळी युक्रेन देशवासी असलेल्या सर्गेई कार्याकिनने २००२मध्ये पटकावला होता. त्या वेळी कार्याकिन १२ वर्षे ७ महिन्यांचा होता. आज ज्याची जगातील पहिल्या दहा बुद्धिबळपटूंमध्ये गणना होते, असा हा कार्याकिन गेल्या वर्षी जगज्जेतेपदाच्या लढतीत आव्हानवीर होता. प्रज्ञानंदला गेल्या वर्षीच कार्याकिनचा विक्रम मोडण्याची संधी होती, जी अवघ्या अध्र्या गुणाने हुकली. प्रज्ञानंदची बहीण वैशाली हिची अति टीव्ही पाहण्याची सवय मोडून काढण्यासाठी आई-वडिलांनी तिला बुद्धिबळाकडे ‘वळवले’. तिच्यासोबत लहानगा प्रज्ञानंदही बुद्धिबळाच्या क्लासला जाऊ लागला. पुढे या बहीण-भावांना ‘चेस गुरुकुल’ या चेन्नईतील नामवंत अकादमीत प्रवेश मिळाला आणि अंगभूत प्रज्ञेला सुयोग्य दिशा मिळाली. प्रज्ञानंदचा प्रशिक्षक आर. बी. रमेश हा स्वत: उत्तम ग्रॅण्डमास्टर होता. पण आता त्याने पूर्णपणे प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाला वाहून घेतले आहे. भारतीय ऑलिम्पियाड संघाचाही तो प्रशिक्षक आहे. प्रज्ञानंदच्या बाबतीत रमेश सांगतो, की त्याची एकाग्रता पाहून मला कधी कधी भीती वाटते. त्याची सर्वात लहान ग्रॅण्डमास्टर बनण्याची संधी हुकली, त्या वेळी मला अतिशय वाईट वाटले. पण खुद्द प्रज्ञानंदने याविषयी कधीच खेद व्यक्त केला नाही. उलट तो दुसऱ्या दिवशी अकादमीत आला आणि काही काळ बुद्धिबळ सोडून टेबल टेनिस खेळला. ही परिपक्वता त्याच्यात इतक्या लहानपणीच आलेली आहे. स्पर्धा, प्रतिस्पर्धी, विक्रम यांचे कोणतेही दडपण तो घेत नाही. काही वेळा बरोबरी साधून भागण्यासारखे असले, तरी प्रज्ञानंद केवळ विजयासाठीच प्रयत्न करीत राहतो. तो अत्यंत आक्रमक खेळतो. नवनवीन ओपनिंग, व्यूहरचना चटकन आत्मसात करतो. जगातला चौथा लहान ग्रॅण्डमास्टर पुढे जगज्जेता बनला. त्याचे नाव मॅग्नस कार्लसन. प्रज्ञानंदही त्याच वाटेवर निघाला आहे.