मौखिक इतिहास ही आज इतिहासलेखनाची विद्वन्मान्य शाखा ठरली आहे; परंतु वसाहतवादाच्या आद्यकाळापासून स्थानिकांकडून माहिती घेऊन ती आपल्या भाषेत मांडण्याचे काम अनेकांनी केलेले होते. या प्रकारचे काम करणारे रोनाल्ड व्हिव्हियन स्मिथ हे अगदी गेल्या आठवडय़ापर्यंत आपल्यात होते. ‘दिल्लीचा मौखिक इतिहास लिहिणारे’ म्हणून नावाजलेल्या स्मिथ यांचे निधन ३० एप्रिलच्या सकाळी, वयाच्या ८४व्या वर्षी झाले. ‘दिल्ली : अननोन टेल्स ऑफ अ सिटी’, ‘द दिल्ली दॅट नो वन नोज्’, ‘कॅपिटल व्हिग्नेट्स’ ही त्यांची पुस्तके आता मागे उरली.
आर.व्ही. हे मूळचे आग्र्याचे . त्यांचे वडील थॉमस स्मिथ हे पत्रकार होते. वडिलांप्रमाणेच आर.व्ही.देखील पत्रकार झाले. आग्रा शहरातील त्यांचे घर जुने, आदल्या शतकातले होते आणि ताजमहाल/ आग्रा किल्ला / फत्तेपूर सिक्री यांखेरीज या शहरात काय आहे, या प्रश्नाची अनेक उत्तरे त्यांना माहीत होती.. तवायफ, पान, शायरांचे अड्डे.. अशी कितीतरी जिवंत उत्तरे. शिवाय, भूताखेतांचा वावर कुठेकुठे असतो याच्या कथासुद्धा! असे म्हणतात की, आर.व्ही. आग्रा सोडून दिल्लीस आले ते, एका विवाहित स्त्रीसह (तिच्या मर्जीने) त्यांनी गांधर्वविवाह केल्यामुळे. सुरुवातीच्या दिवसांत त्यांचा मुक्काम ‘नाज्म हॉटेल’मध्ये होता आणि इथे साहिर लुधियानवी, मजरूह सुल्तानपुरी यांसारखे कवी आणि एम.एफ. हुसेन, जे.स्वामिनाथन यांसारखे चित्रकार यांचाही राबता असे. तेथून आजाद हिंद हॉटेलात, मग दर्यागंजमध्ये आणि अखेर, पत्नीवियोगानंतर मायापुरी भागात त्यांचा मुक्काम झाला. पण त्यांचे खरे ‘घर’ म्हणजे जुन्या दिल्लीतील गल्ल्या. प्रत्येक हवेली-कोठीने जणू आपापला इतिहास त्यांना सांगितला होता!
‘द स्टेट्समन’ या वृत्तपत्रात त्यांनी दीर्घकाळ काम केले. बातमीदार, उपसंपादक, मुख्य उपसंपादक अशा पदांवर चाकरी करतानाच दिल्लीविषयीचे साप्ताहिक सदर ते लिहू लागले आणि १९७८ ते १९९६ पर्यंत, आणि १९९६ मध्ये निवृत्त झाल्यानंतरही त्यांचे सदरलेखन सुरूच राहिले. या सदरांतील लेखांचे फेरसंपादन करून पुस्तके निघाली. मात्र त्याआधीच, जयपूर- आग्रा- दिल्ली येथील ब्रिटिश काळातील ख्रिस्ती पाऊलखुणांचा इतिहास त्यांनी वडिलांसह पुस्तकरूपाने लिहिला होता.
अकबर आणि जहांगीर यांच्या काळापासून मुघल महालांत साजरी होणारी दिवाळी, धर्मभेद न मानणारा पतंगांचा शौक, कबूतरबाजी, उत्तर भारतातील सूफी परंपरा असे अनवट विषय शोधून त्यांबद्दल चौफेर माहिती मिळवणे, हे आर.व्ही. यांचे मोठे वैशिष्टय़. त्यांना इतिहासकार म्हणून विद्यापीठीय मान्यता मिळाली नाही, लेखक म्हणून कुठले पुरस्कारही मिळाले नाहीत. पण वाचकांचे प्रेम मात्र भरपूर मिळाले. अवलियासारखे आयुष्य जगून, दिल्लीचा भूतकाळ हाच श्वास मानून आर.व्ही. गेले; तेव्हा ‘‘सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प’ रेटला जात असल्याचे दु:ख होण्यापूर्वीच ते सुटले, हे एका अर्थी बरे’ अशीही प्रतिक्रिया उमटली.