मुंबईच्या चौपाटी भागात शिल्पकार विनायकराव वाघ यांनी स्थापलेला स्टुडिओ चालविणारे तिसऱ्या पिढीचे शिल्पकार विनय वाघ असोत की विजयवाडा येथील शिल्पकार बीएसव्ही प्रसाद, देशभरातील अनेक स्मारक-शिल्पकार राम सुतार यांना गुरुस्थानी मानतात. शिल्पकलेला १९६० नंतरच्या कलेतिहासात नवनवे फाटे फुटत गेलेले असतानाही स्मारक-शिल्पांची कला अबाधित राहिली, कारण राज्ययंत्रणा आणि लोक यांच्यामधील संवादाचे काम ही शिल्पे करीत असतात. राम सुतार हे स्वातंत्र्योत्तर भारतीय स्मारकशिल्पांचा इतिहास घडवणाऱ्यांपैकी एक. प्रचंड आकाराची शिल्पे हे त्यांचे गेल्या कैक वर्षांपासूनचे वैशिष्टय़. परवाच केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडून २०१४ पासून २०१६ पर्यंतचे ‘रवीन्द्रनाथ टागोर संस्कृती पुरस्कार’ घोषित झाले, त्यात २०१६ सालासाठी राम सुतार यांची निवड अनपेक्षित नव्हती.
वयाने ९३ वर्षांचे असलेल्या राम सुतार यांनी १९६० पासून स्वतंत्रपणे स्टुडिओ थाटला. संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) असे पुतळे घडविले आहेत, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही अनेक पुतळे त्यांनी घडविलेले आहेत, रवीन्द्रनाथ टागोर यांचा टोकिओतील पुतळा राम सुतार यांनी निर्मिलेला आहे, तसेच गांधीजींचे त्यांच्या स्टुडिओत घडलेले अनेक अर्धपुतळे भारत सरकारने परदेशांना भेट म्हणून दिलेले आहेत. नेत्यांच्या जीवनातील प्रसंगांचे दर्शन घडविणारी भित्तिशिल्पे हेही सुतार यांचे वैशिष्टय़. दिल्लीत राजीव गांधी यांचे योगदान सांगणारे भित्तिशिल्प तसेच जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या तीन पिढय़ांची कारकीर्द एकत्रित मांडणारे मोठे भित्तिशिल्प राम सुतारांच्या कल्पनेतून साकारले आहे.
स्मारकशिल्पांमधून सौंदर्यमूल्यांशी तडजोड न करता सहज सर्वाना भिडेल असा दृश्यसंदेश देण्यासाठी निराळी- बहिर्मुख आणि अंतर्मुख अभिव्यक्तीचा मेळ घालणारी- कल्पनाशक्ती आवश्यक असते. तिचे उत्तम उदाहरण म्हणजे राम सुतार! तिशीच्या आतबाहेर असताना (१९५२ ते ५८) आधी अजिंठा-वेरुळ येथील शिल्पांच्या डागडुजीचे आणि नंतर पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्पे बनविण्याचे काम त्यांनी सरकारी नोकरीत राहून केले, या दोहोंतून स्मारकशिल्पांसाठी काय घ्यायचे आणि काय सोडून द्यायचे याचा अंदाज पक्का होत गेला असावा. चंबळ नदीवरील गांधीसागर धरणानजीकचे ‘चंबळा आणि तिला बिलगलेली दोन बालके’ (बालके हे या धरणाचे लाभ मिळणाऱ्या मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांचे प्रतीक) असे ४५ फुटी शिल्प, हा त्यांच्या कलेतील ‘भारतीयते’चा आदर्श ठरला. याच प्रकारे गंगा आणि यमुना, हरिजन आणि गांधी अशी शिल्पेही त्यांनी घडविली आहेत. अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदू मिलचे प्रस्तावित आंबेडकर स्मारक आणि पुढील आठवडय़ात उद्घाटन होणारा चिनी बनावटीचा सरदार पटेल यांचा पुतळा ही, उंचीत एकमेकांशी स्पर्धा करणारी तिन्ही स्मारकशिल्पे राम सुतार यांच्या मूळ कल्पनेतून उतरली आहेत. गेले अर्धशतकभर दिल्लीतच राहणारे, पण मूळचे धुळे जिल्ह्य़ातले आणि मुंबईच्या ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये शिकलेले राम सुतार हे आपल्या राज्याला अभिमान वाटावा असे महाराष्ट्रपुत्र आहेत.