क्रिकेट गुरू आणि प्रशिक्षक अशा बिरुदांनी रमाकांत आचरेकर यांना गौरवले जाते, तरी त्यांचा पिंड एका कणखर, सजग शाळामास्तराचा होता. सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक असे त्यांना क्रिकेट जगत ओळखते. त्यांच्या दृष्टीने सचिन हा अखेपर्यंत शिष्यच होता. घरातल्या दिवाणखान्यात टीव्हीवर सचिनचा सामना ते पाहात असतानाची काही छायाचित्रे नेहमीच झळकत राहिली. त्यांत आचरेकर सरांच्या चेहऱ्यावर कौतुकापेक्षा करडे चिकित्सक भाव दिसून यायचे. त्याच चिकित्सेने त्यांनी आयुष्यभर सचिनसारख्या अनेक शिष्यांचा खेळ न्याहाळला, त्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कौतुक मोजके पण कानपिचक्या धारदार दिल्यानेच शिष्य प्रगतिपथावर राहतो नि जमिनीवर राहतो अशी त्यांची श्रद्धा. १९९२मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि प्रवीण अमरे असे त्यांचे तीन शिष्य खेळले. या तिघांपलीकडेही अर्थात त्यांचा शिष्यगण मोठा आहे. चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, अमोल मुझुमदार, पारस म्हांब्रे, बलविंदर संधू ही काही नावे. त्यांनी अनेक उत्तम रणजीपटू आणि प्रथम श्रेणी क्रिकेटपटूही घडवले. कितीतरी क्रिकेटपटूंना त्यांच्या क्रिकेट कौशल्याच्या जोरावर सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये नोकऱ्या मिळाल्या, कुटुंबे उभी राहिली. रमाकांत आचरेकर उत्तम रत्नपारखी होते. एखादा मुलगा त्यांना योग्य वाटला, की त्याला योग्यरीत्या क्रिकेट मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळावे यासाठी ते जंगजंग पछाडत. प्रसंगी त्याच्या पालकांकडे शाळा किंवा महाविद्यालय बदलण्यासाठी आग्रह धरत, आर्थिक मदत करत. त्यांचा दरारा आणि निष्ठा सर्वज्ञात असल्यामुळे फार कुणी पालक त्यांना नाही म्हणूच शकत नव्हते. कारण एकदा का आचरेकर मास्तरांच्या हाताखाली पाल्य गेला, की त्याचे भविष्य सुरक्षित झाले याविषयी त्यांना खात्री वाटे. हा सगळा इतका गोड-गुलाबी मामला नव्हता. मैदानावर आचरेकरांच्या प्रत्येक शिष्याला प्रचंड कष्ट घ्यावे लागत. ‘सरळ खेळा नि सरळ जगा’ असा आचरेकरांचा गुरुमंत्र असे. त्यातूनच मुंबईला अनेक तंत्रशुद्ध फलंदाज मिळत गेले. शिवाजी पार्कवर खेळणाऱ्या प्रत्येक शिष्यावर आचरेकर सरांची नजर असे. चांगल्या कामगिरीबद्दल ते बक्षीस देत, पण चुकांबद्दल शिक्षाही करत. एखादे शतक, द्विशतक किंवा त्रिशतक झळकावूनही आचरेकर सरांकडून ‘प्रसाद’ मिळाल्याच्या आठवणी त्यांचे अनेक शिष्य सांगतात. कारण काय, तर इतका चांगला खेळत असताना असा खराब फटका मारून बाद होणे त्यांना अजिबात पसंत पडायचे नाही! मग शंभर-दोनशे धावा त्यांच्यासाठी फिजूल होत्या. चांगल्या विद्यार्थ्यांच्या अनेक पिढय़ा घडवणाऱ्या गुरुजींचे एक प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे, विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी जमिनीवर राहील याविषयी त्यांच्याकडून मिळालेली चिरंतन शिकवण! आचरेकर मास्तर अशा गुरूंपेक्षा वेगळे नव्हते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा