मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अत्यंत देखणे, डॅशिंग, सदाबहार नट म्हणून रमेश भाटकर ओळखले जात. कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीलाही त्यांचे हे रूप कोमेजवता आले नाही. शेवटपर्यंत ते नाटय़-चित्रपटांमध्ये सक्रिय होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’मध्ये ते पृथ्वीराज चव्हाणांच्या भूमिकेत होते. डॉ. काशिनाथ घाणेकरांनी गाजवलेल्या ‘अश्रूंची झाली फुले’मधील लाल्याच्या भूमिकेसाठी ‘नाटय़संपदा’चे निर्माते प्रभाकर पणशीकर यांना तितक्याच तोलामोलाची रिप्लेसमेंट मिळाली ती रमेश भाटकरांच्या रूपात! घाणेकरांनी छाप पाडलेल्या भूमिकेवर आपली नाममुद्रा उमटवणे हे खचितच सोपे नव्हते. परंतु रमेश भाटकरांनी आपल्या शैलीदार अभिनयाने या भूमिकेवर आपली वेगळी मोहोर उमटविली. असे अपवादानेच घडते. मराठी प्रेक्षकांना उत्तम अभिनय करणारा नट आवडतो. मग त्याच्याकडे चार आणे रूप कमी असले तरी त्यांना चालते. रमेश भाटकर याला अपवाद होते. त्यांच्याकडे रूपाबरोबरच शैलीदार अभिनयही होता. अलीकडे त्यांचे नाटक-सिनेमे कमी झाले होते तरी ग्रामीण भागातली त्यांची क्रेझ जराही कमी झाली नव्हती. अनेक वर्षे नाटय़ संमेलनातील दिंडीचे ते प्रमुख आकर्षण असत. दिंडीतील त्यांचे उत्स्फूर्त जोशिले नृत्य अनेकांच्या पायांना ताल धरायला लावीत असे. भाटकरांची अनेक रूपे होती. ते उत्तम वाचक होते. चांगले गायक होते. आपले वडील संगीतकार स्नेहल भाटकरांकडून त्यांना हा वारसा मिळाला होता. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना ते आवर्जून सपत्नीक हजेरी लावत. ते एक संवेदनशील कलावंत होते. ‘प्रेमाच्या गावा जावे’ या पुनरुज्जीवित नाटकाच्या एका दौऱ्यात हवा तसा प्रेक्षक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी निर्मात्याकडून मानधन घेण्यास नकार दिला होता. गप्पांच्या मैफलीचे ते बादशहा होते. नाटक, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांत प्रदीर्घ काळ संचार केल्यामुळे त्यांच्यापाशी अनुभवांचे मोठे संचित होते. त्यातून ते या क्षेत्रांत येणाऱ्या नव्या मंडळींना सल्ला देत, मार्गदर्शन करीत. आपल्या व्याधीच्या दुर्धरतेची कल्पना आल्यावर कोसळून न पडता उरलेल्या दिवसांत आपल्या आवडीच्या कला क्षेत्रात जमेल तितके कार्यरत राहण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला. ही खरोखरीच दुर्मीळ बाब होय. ‘आनंद’ सिनेमातील राजेश खन्ना रमेश भाटकर यांनी आपल्या प्रत्यक्ष जगण्यातून सार्थ करून दाखविला. असे धीरोदात्तपणे वास्तवाला सामोरे जाणे क्वचितच पाहायला मिळते. माणूस व कलावंत म्हणून ते किती सखोल होते, हे त्यांच्या या अखेरच्या दिवसांत त्यांनी दाखवून दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा