ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांच्या निधनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारशृंखलेतील महत्त्वाचा दुवा निखळला आहे. रामकृष्णदादांचा जन्म अमरावती जिल्ह्य़ातील वरखेडचा. शेतकरी कुटुंबातला. घरची साधारण परिस्थिती. दादांचे शिक्षण वरखेड येथे चौथीपर्यंत झाले. वयाच्या बाराव्या वर्षी ते राष्ट्रसंतांच्या सान्निध्यात आले. त्यांच्या आईने त्यांना राष्ट्रसंतांच्या विचारकार्यात समर्पित होण्यास परवानगी दिली आणि त्यांचे जीवन बदलून गेले. तुकडोजी महाराजांनी रचलेली ग्रामगीता त्यांनी मुखोद्गत केली आणि राष्ट्रसंतांच्या हयातीतच त्यांना ग्रामगीताचार्य म्हणून गौरवण्यात आले. रामकृष्णदादा हे उत्तम मल्ल, व्यायामपटूदेखील होते. त्यांनी राष्ट्रसंतांच्या प्रेरणेतून लोकजागृतीचा मार्ग निवडला. आपल्या सुश्राव्य वाणीतून रसिकांची मने जिंकणाऱ्या रामकृष्णदादांनी राष्ट्रसंतांच्या विचारांचा, ग्रामगीतेचा प्रचार केला. ते एक नाटय़ कलावंत, दिग्दर्शक, शाहीर, कवी व लेखक होतेच शिवाय आयुर्वेदाचेही ते जाणकार होते. त्यांनी सुमारे ६० पुस्तके लिहिली. अनेक पुस्तकांचे संपादनही केले. १९६४ मध्ये दादांनी राष्ट्रसंतांच्या हस्ते माणिक प्रकाशनाची स्थापना केली होती. या संस्थेने अनेक ग्रंथांचे प्रकाशन केले आहे.
ग्रामगीतेचे अधिकृतपणे १९५५ मध्ये प्रकाशन झाले, पण त्याआधीपासून दादांनी ग्रामगीतेवर प्रवचने सुरू केली होती. त्यांची काही प्रवचने तुकडोजी महाराजांनी ऐकली. त्यांनी दादांना प्रवचनासाठी आणखी प्रेरित केले. ग्रामगीतेच्या प्रवचनासाठी पैशांची बोली आणि बुवाबाजी करू नका, हा मंत्र तुकडोजी महाराजांनी दादांना दिला. त्याचे आजन्म पालन दादांनी केले. तुकडोजी महाराजांसह संत गाडगेबाबा, लहानुजी महाराज, सत्यदेवबाबा, विनोबा भावे, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यासह अनेक विभूतींचा सहवास त्यांना लाभला. त्यातून दादांचे व्यक्तिमत्त्व फुलत गेले. त्यांनी गावागावांमध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखा उघडण्यात पुढाकार घेतला. त्यांनी श्री गुरुदेव नाटय़ मंडळाचीही स्थापना केली होती. समाजप्रबोधनपर नाटकांमधून दादांनी रंगभूमीही गाजवली. श्री गुरुदेव व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना करून गावांमधील युवकांना एकत्रित केले. त्यांना व्यसनापासून दूर ठेवण्याचे कार्य या मंडळाने केले. राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरातसह विविध राज्यांमध्ये प्रवास केला. या ठिकाणीही दादांच्या वाणीतून ग्रामगीता प्रवचनाचा झंझावात सुरूच होता.
रामकृष्णदादांना वा. कृ. चोरघडे स्मृती साहित्य पुरस्कार, दे. ग. सोटे ग्रामीण साहित्य पुरस्कार, ग्राममहर्षी पुरस्कार, व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, आदिवासी सेवक पुरस्कार, जीवनव्रती स्वामी विवेकानंद पुरस्कार, विदर्भभूषण पुरस्कार, मा. सा. कन्नमवार स्मृती साहित्य पुरस्कार यांसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. वर्धा जिल्ह्य़ातील तळेगाव श्यामजीपंत येथे दादांनी १९९३ मध्ये मानव विकास ज्ञान साधनाश्रमाची निर्मिती केली. राष्ट्रसंतांनी देवभक्तीला देशभक्तीची जोड दिली होती.
राष्ट्रसंतांच्या प्रबोधनपर्वाचे ते साक्षीदार होते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न रामकृष्णदादांनी केला.