नौदलाच्या महाराष्ट्र क्षेत्राचे प्रमुख म्हणून रिअर अ‍ॅडमिरल राजेश पेंढारकर यांनी पदभार स्वीकारला आहे. नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाच्या अखत्यारीतील हे क्षेत्र आहे. या निमित्ताने देशाच्या आर्थिक राजधानीच्या संरक्षणाची जबाबदारी मराठी व्यक्तीकडे आली आहे.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रशिक्षण पूर्ण करून पेंढारकर हे जानेवारी १९८७ मध्ये नौदलात दाखल झाले. पाणीबुडीविरोधी युद्ध पद्धतीचे तज्ज्ञ म्हणून ते ओळखले जातात. नौदलाच्या ताफ्यातील अनेक युद्धनौकांवर त्यांनी काम केले आहे. ३२ वर्षांच्या सेवेत त्यांनी सागरी क्षेत्राबरोबर नौदलाच्या विविध विभागांत महत्त्वाच्या पदांची धुरा सांभाळली. भरती मंडळ, प्रशासकीय आणि नेट केंद्रीय कार्यवाही विभागात त्यांनी काम केले. वेलिंग्टनचे डिफेन्स सव्‍‌र्हिस स्टाफ महाविद्यालय, करंजास्थित नौदल युद्ध महाविद्यालयातून पदवी मिळवली. अमेरिकेतील नेव्हल कमांड महाविद्यालयातून संरक्षण आणि सामरिक शास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यांना रिअर अ‍ॅडमिरल पदावर बढती मिळाली. संयुक्त कर्मचारी (आईएनटी-ए) विभागाचे सहप्रमुख, पश्चिमी मुख्यालयाच्या कार्यवाही विभागाचे प्रमुख म्हणून पेंढारकर यांनी जबाबदारी सांभाळली. देशाला तब्बल साडेसात हजार किलोमीटरहून अधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. किनाऱ्यापासून १२ नॉटिकल मैल अंतरावर देशाची प्रादेशिक समुद्र सीमा आहे.  सागरी सीमांच्या रक्षणासोबत नौदलावर व्यापारी जहाजांचे समुद्री मार्ग संरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे. सागरी सीमांच्या सुरक्षेसाठी तीन प्रकारची कवचे आहेत. त्यात समुद्रकिनाऱ्यापासून पाच नॉटिकल मैलापर्यंतच्या क्षेत्राची जबाबदारी सागरी पोलीस (राज्य शासन), पाच ते बारा नॉटिकल मैल अर्थात प्रादेशिक (किनारा) विभागाची तटरक्षक दल आणि बारा नॉटिकलच्या पुढे म्हणजे प्रादेशिक सीमेच्या पलीकडील जबाबदारी नौदलावर होती. २६-११ च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर हा निकष बदलावा लागला. सागरी सीमांची सुरक्षा राखण्यासाठी तटरक्षक दल, सागरी पोलीस सुसज्ज होईपर्यंत या संपूर्ण क्षेत्राची जबाबदारी नौदलावर सोपवली गेली. नौदलाच्या देखरेखीखाली ती व्यवस्था कार्यान्वित होत आहे.  समन्वय राखण्यासाठी संयुक्त कार्यवाही केंद्राची स्थापना झालेली आहे. महाराष्ट्र क्षेत्राची जबाबदारी सांभाळताना पेंढारकर यांना आजवरचा अनुभव कामी येऊ शकतो.

Story img Loader