देवाच्या कोणत्याही मूर्तीकडे पाहताना ती मूर्ती सजीव वाटणे हे त्या मूर्तिकाराचे किंवा शिल्पकाराचे कौशल्य असते. त्या मूर्तीची सुबक व आखीव-रेखीव बांधणी, आखणी आणि मूर्तीचे डोळे हा मूर्तीतील खरा प्राण असतो. ज्येष्ठ मूर्तिकार विजय खातू यांनी आपल्या हस्तकौशल्याने गेली ४९ वर्षे गणपती मूर्तीवर स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटविला होता. यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे पडघम सुरू झाले असतानाच बुधवारी त्यांची निधनवार्ता येणे, हे दु:खद आणि धक्कादायकही आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व गणेशभक्तांच्या मनामध्ये त्यांनी तयार केलेल्या मूर्तीनी खास स्थान निर्माण केले. कोणतीही मूर्ती तयार करताना मूर्तीचा ‘तोल’ (बॅलन्स) सांभाळणे ही सगळ्यात महत्त्वाची व कठीण गोष्ट. उभी गणेशमूर्ती साकारताना, विशेषत: २० ते २५ फूट उंच मूर्ती तयार करताना याची विशेष काळजी घ्यावी लागते. ती योग्य आकारात आहे की नाही याचाही विचार करावा लागतो. विजय खातू यांनी हे सर्व तंत्र सांभाळले. त्यामुळेच गणपतीची मूर्ती आणि विजय खातू असे अतूट नाते तयार झाले. ही प्रसिद्धी आणि नावलौकिक मिळविण्यासाठी खातू यांनी अपार मेहनत, अभ्यास आणि परिश्रम घेतले. एकापेक्षा एक सरस आणि उत्कृष्ट मूर्ती घडविणाऱ्या खातू यांनी मूर्तिकलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले नव्हते. इतर मूर्तिकारांचे काम पाहणे, निरीक्षण करणे, मार्गदर्शन घेणे यातून त्यांनी स्वत:तील मूर्तिकार घडविला.

मूर्तिकला हा खातू घराण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय. त्यांचे वडील आर. व्ही. खातू हे गणपती मूर्तिकार होते. सुरुवातीला ते अन्य मूर्तिकारांकडे काम करीत होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांनी स्वत:चा मूर्ती तयार करण्याचा कारखाना सुरू केला. घरातच मूर्तिकला असल्याने तो वारसा त्यांना लहानपणापासूनच मिळाला. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या कलेचे धडे गिरविले. गुरु-शिष्य परंपरेप्रमाणे सुरुवातीला केवळ मदतनीस, पण अंगभूत कौशल्यामुळे पुढे अल्पावधीत रंगकाम, मूर्ती घडवण्यापर्यंतची मजल त्यांनी मारली. त्यांच्या वडिलांसह धर्माजी पाटकर आणि दीनानाथ वेलिंग हे खातू यांचे गुरू. मूर्ती कशी उभी करायची, तोल कसा साधायचा याचे धडे त्यांनी वेलिंग यांच्याकडून घेतले. तर वडिलांकडून रंगकाम व पाटकर यांच्याकडून आखणी शिकले. पुढे खातू आणि त्यांचे दोघे बंधू यांनी हा वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळला आणि नावारूपाला आणला.

मोठय़ा गणेशमूर्ती हा मुंबईकरांच्या अभिमानाचा विषय व्हावा, अशी कामगिरी त्यांनी केली. उंच मूर्तीवर पुढे टीका होऊ लागली, परंतु गिरणी संपापूर्वीच्या गिरणगावाला या भव्यतेचे अप्रूप होते. चिंचपोकळी दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची पंधरा फूट उंचीची घडविलेली मूर्ती त्यांची पहिली मोठी ऑर्डर होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची वीणावादन करणारी गणेशमूर्ती, चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मोरपिसावरील मूर्ती या त्यांनी तयार केलेल्या मूर्तीचे कौतुक झाले. मुंबईतील बहुतांश प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती त्यांनीच घडविल्या. गणेश गल्लीचा मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी गणेश आणि अन्य मंडळांचा यात समावेश आहे. परळ येथील त्यांच्या कार्यशाळेत दरवर्षी पाचशे ते आठशे मूर्ती तयार होत. आगामी गणेशोत्सवासाठीही दरवर्षीप्रमाणे त्यांची तयारी सुरू असताना, तो पाहण्यासाठी न थांबता विजय खातू गेले.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renowned ganpati idol maker vijay khatu