आज चाळिशीत असलेल्या तमिळ लोकांना शाळेपासून भाषेचे, कवितेचे आणि ज्ञानाचेही पाथेय देणारे कवी एम. एल. (लेनिन) थंगप्पा आपसूकच माहीत असतील.. पण ‘चोलक कोल्लइ बोम्मई’ (बुजगावणे) या तमिळ बालकविता संग्रहाला २०११ चा साहित्य अकादमी बालवाङ्मय पुरस्कार, तर पुढल्याच वर्षी (२०१२) ‘लव्ह स्टँड्स अलोन’ या संगम काव्याच्या इंग्रजी अनुवादाला साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार असा दुर्मीळ योग थंगप्पांबाबत जुळून आला होता, हे अनेकांना माहीत नसते! या थंगप्पांची निधनवार्ता शनिवारी आली.
तमिळनाडूच्या कुरुम्बळपेरि गावात (जि. तिरुनेलवेलि) १९३४ साली जन्मलेल्या थंगप्पांना लोकसाहित्याचे बाळकडू आईवडिलांकडून मिळाले, पण वयाच्या सहाव्या वर्षी ‘कम्ब रामायणा’चे गायन करण्याची हुनर दाखवणारा आपला भाऊ कवीच आहे, हे त्यांच्या बहिणीने ओळखले. ती त्या काळातील शिक्षिका. विषय सोपा करून सांगण्यासाठी तिला थंगप्पा बडबडगीतांसारखी गाणी लिहून देत. हे थंगप्पांचा शाळाचालक मित्र कोवेन्दन याने पाहिले आणि ‘चल माझ्यासह मद्रासला’ असा आग्रह करून त्यांना बाहेरच्या जगात नेले. लवकरच, कोणताही विषय सोप्या- चालीत म्हणता येणाऱ्या कवितांमधून मांडणारे शिक्षक अशी थंगप्पांची ख्यातीच झाली! (आपल्याकडे साधारण याच सुमारास, ‘नवयुग वाचनमाले’तून आचार्य अत्रे भूगोलासारखा विषयही कवितांतून मांडत होते).
थंगप्पांच्या या बालकवितांचे पुस्तक प्रकाशित व्हावे, असा आग्रह त्यांच्या एका महिला सहकाऱ्याने धरला. वयाच्या २१ व्या वर्षी थंगप्पांनी तो पूर्णही केला आणि याच शिक्षिकेशी पुढे त्यांचा विवाह झाला! त्या १९५५ सालच्या पुस्तकाच्या आवृत्त्या आजही निघतात. त्या पहिल्या पुस्तकानंतर चारच वर्षांनी, १९५९ मध्ये थंगप्पांनी पाँडिचेरीकडे (आताचे पुडुचेरी) प्रयाण केले. थंगप्पांची तेथील नोकरी इंग्रजी शिकवण्याची होती. सन १९६७ पर्यंत विविध शाळांत त्यांनी इंग्रजी शिकवले आणि १९६८ पासून ८८ पर्यंत त्यांनी पुडुचेरीच्याच टागोर आर्ट्स कॉलेजात इंग्रजीचे अध्यापन केले. भारतीसदन महिला-महाविद्यालयात पुढे त्यांना प्राध्यापकपद मिळाले.
ही अध्यापन क्षेत्रातील कुणाहीसारखी कारकीर्द करीत असताना बालवाङ्मयाखेरीज आणखीही काही थंगप्पा लिहीत होते. त्यांच्या नावावर आयुष्यभरात ५० हून अधिक पुस्तके आहेत. त्यांपैकी अनेक अनुवाद आहेत. तमिळमधून इंग्रजीत थंगप्पांनी अनुवादित केलेल्या या पुस्तकांपैकी काही पुस्तके, ही पद्यानुवाद आहेत हे विशेष! मराठीत संतकवींच्या अभंग-ओव्यांचे जे स्थान, तेच तमिळमध्ये ‘संगम’ काव्याचे. या संगम प्रकारातील काव्याचा थंगप्पांनी इंग्रजीत केलेला अनुवादही काव्यमय आहे. असाच काव्यमय अनुवाद त्यांनी सुब्रमण्यम भारती यांच्या निवडक कवितांचाही केला. काही गद्यानुवादही त्यांनी केले. तमिळमध्ये समीक्षालेखनही त्यांनी केले, परंतु इंग्रजी अनुवादांतून त्यांची समीक्षादृष्टी आणि काव्यदृष्टी यांचा खरा मिलाफ झाला. हा विरळा मिलाफ आता निमाला आहे.