युरोपशी आर्थिक आणि राजकीय काडीमोड घेणारा ब्रिटन काहीशा अनिश्चिततेच्या उंबरठय़ावर उभा आहे. ब्रिटनशी राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक ऋ णानुबंध वर्षांनुवर्षे वृद्धिंगत झालेल्या भारतासमोरही त्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या अनिश्चिततेच्या झाकोळात ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तपदाची जबाबदारी रुची घनश्याम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. हे महत्त्वाचे पद भूषवणाऱ्या त्या केवळ दुसऱ्या भारतीय महिला ठरतील. यापूर्वी विजयालक्ष्मी पंडित या ब्रिटनमधील भारताच्या पहिल्या महिला उच्चायुक्त होत्या. १९५४ ते १९६१ असा सर्वाधिक काळ पंडित या उच्चायुक्त होत्या. तो काळ भारलेला आणि निराळा होता. आजची आव्हाने पूर्णपणे भिन्न आहेत. ‘ब्रेग्झिटोत्तर’ ब्रिटनबरोबर विशेषत: राजकीय आणि व्यापारी संबंधांची फेरआखणी आणि फेरजुळणी करावी लागणार आहे. याशिवाय विजय मल्या, नीरव मोदी अशा आर्थिक घोटाळेबाजांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा आहेच. प्रत्यार्पणाची लढाई राजनैतिक पातळीवरूनही लढावी लागणार आहे. या संघर्षमय, आव्हानात्मक वातावरणात रुची यांच्या मुत्सद्देगिरीची कसोटी लागेल.
रुची यांनी मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर १९८२ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत प्रवेश केला. त्यांचे पती ए. आर. घनश्याम हेही त्याच वर्षी परराष्ट्र सेवेत दाखल झाले. रुची सध्या परराष्ट्र खात्यात पश्चिम विभागाच्या सचिव आहेत. दक्षिण आफ्रिका, घाना या देशांमध्ये त्यांनी उच्चायुक्त पदावर काम पाहिले. पश्चिम युरोप या महत्त्वाच्या विभागात त्यांनी सहसचिव आणि अतिरिक्त सचिव या पदांची जबाबदारी सांभाळली. पाकिस्तानशी भारतीय संबंध कधी खूप सुधारलेले (वाजपेयी लाहोर यात्रा) किंवा कधी प्रचंड बिघडलेले (संसद हल्ला) असताना, रुची यांनी इस्लामाबाद आणि नवी दिल्ली अशा दोन्ही ठिकाणी त्या कालखंडाचा अनुभव घेतला. ब्रसेल्स आणि काठमांडू येथील वकिलातींमध्येही त्यांची नियुक्ती झाली होती. राष्ट्रकुल राष्ट्रप्रमुखांच्या नुकत्याच लंडनमध्ये झालेल्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गेलेल्या शिष्टमंडळात त्यांचा समावेश होता. ती त्यांच्या लंडनमधील भविष्यातील जबाबदारीची नांदी ठरली. ब्रेग्झिटोत्तर ब्रिटन नवीन सहकाऱ्यांच्या शोधात आहे. भारतासारख्या नवप्रगत, बाजाराभिमुख अर्थव्यवस्थेशी नव्याने संबंध प्रस्थापित करणे ही त्या देशाचीही गरज बनली आहे. या परिस्थितीत मुक्त व्यापार धोरण, व्हिसा निर्बंध शिथिलीकरण अशा कळीच्या मुद्दय़ांवर ब्रिटनशी वाटाघाटी कराव्या लागतील.
चीन, अमेरिका, युरोपीय समुदाय, जपान हे सध्या भारताचे महत्त्वाचे व्यापारी आणि गुंतवणूक भागीदार आहेत. या दोन्ही आघाडय़ांवर ब्रिटनशी संबंध वाढवण्याच्या प्रक्रियेत रुची घनश्याम यांची भूमिका आणि कौशल्य पणाला लागणार आहे.