तंबाखूसेवन, धूम्रपान हे व्यसन सर्वच वयोगटांत व समाजाच्या सर्व थरांत आढळते. त्यातून तोंडाचा व फुप्फुसाचा कर्करोग बळावतो हे माहीत असतानाही ही जोखीम लोक घेत असतात. प्रत्येक अर्थसंकल्पात सिगारेटवरील कर वाढवला, तंबाखू व सिगारेटच्या पाकिटावर धोक्याचे इशारे चित्ररूपात ठळकपणे छापले, तरीही त्याचा फार मोठा परिणाम होताना दिसत नाही. पण दिल्लीतील आरोग्य खात्याचे अधिकारी एस. के. अरोरा यांनी वेगवेगळ्या माध्यमांतून तंबाखूचे सेवन व धूम्रपान यावर नियंत्रण मिळवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा तंबाखूविरोधी दिनाचा २०१७ मधील पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने एकांडय़ा शिलेदारासारखे प्रयत्न करून मिळवलेले हे यश नक्कीच उल्लेखनीय. त्यांच्या प्रयत्नांतून दिल्लीत धूम्रपानाचे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी झाले आहे. अरोरा हे दिल्लीच्या आरोग्य खात्यात अतिरिक्त संचालक आहेत. भारताच्या या तंबाखूविरोधी मोहिमेतील कामगिरीचा विचार करता त्यात दिल्लीची कामगिरी उजवी ठरली. भारतभरात धूम्रपानाचे प्रमाण तुलनेत २३ टक्के कमी झाले असताना दिल्लीत ते जास्त म्हणजे ३५ टक्क्यांनी कमी झाले आहे. यात गेल्या सहा वर्षांत दिल्लीत तंबाखूचा वापर ६.५ टक्क्यांनी कमी झाला आहे. उर्वरित भारतात गुटख्याचे प्रमाण १७ टक्के कमी झाले असताना दिल्लीत मात्र अरोरा व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांतून ते ६३ टक्के कमी झाले आहे.
यशाची कारणे सांगताना अरोरा म्हणतात की, दिल्लीत तंबाखू व सिगारेटच्या छुप्या जाहिरातींवरही नियंत्रण ठेवले आहे. तंबाखूविरोधी लढा हा विद्यार्थी, पालक व शिक्षक या पातळ्यांवर सुरू झाला पाहिजे. त्यासाठी त्यांनी सीबीएसई व एनसीईआरटी यांना पत्रे पाठवून तंबाखू नियंत्रणाचे पाठ अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास सांगितले. सहावी ते बारावी या वयोगटातच मुलांना तंबाखूविरोधी धडे दिले तर ते परिणामकारक ठरते असा त्यांचा अनुभव आहे. रुग्णालये, शाळा, सरकारी कार्यालये येथे त्यांनी तंबाखूविरोधी मोहीम जोरात राबवली. त्यांच्याच प्रयत्नांतून तंबाखू कंपन्या व त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती करणारे अभिनेते यांना नोटिसा देण्यात आल्या. दिल्लीतील हुक्का पार्लरवर त्यांनी कठोर कारवाई केलीच; शिवाय ई-सिगारेटवरही बंदी घातली. ई-सिगारेटवर एक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन होणार होते, तेही त्यांनी हाणून पाडले.
विशेष म्हणजे दक्षिण व आग्नेय आशियातून अरोरा हे एकमेव विजेते आहेत. इतर राज्यांसाठी त्यांची ही कामगिरी मार्गदर्शक अशीच आहे.