हवामान बदल हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. प्रदूषणामुळे बदलणारे टोकाचे हवामान हे रोगराई व पिकांच्या नुकसानीमुळे जीवघेणे ठरत आहे. असे असले तरी हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांची संख्या नगण्य आहे. त्यात डॉ. एस. के. सतीश यांनी मोठे काम केले आहे. केरळमधील पेरुमकदाविला येथील सरकारी शाळेत शिकूनही या मुलाने वातावरण व सागरी विज्ञानात काम करण्याचे ठरवले व ते स्वप्न नुसते साकारच झाले नाही तर त्यात त्यांना संशोधन करण्याची संधी मिळाली. त्यांना नुकताच इन्फोसिस पुरस्कार जाहीर झाला आहे. १ लाख डॉलरचा हा पुरस्कार अतिशय प्रतिष्ठेचा मानला जातो.

कार्बन एरोसोल म्हणजे कार्बनचे काळे सूक्ष्म कण वातावरणाच्या थरात गेल्यानंतर भारतीय उपखंडातील वातावरणात ऊर्जेचा समतोल बिघडतो व त्यातून पर्यावरण, मानवी आरोग्य यावर हानीकारक परिणाम होतो, असे डॉ. सतीश यांनी केलेल्या संशोधनातून दिसून आले आहे. गेली २५ वर्षे ते वातावरणाच्या क्षेत्रात काम करताना सूक्ष्म कणांचा वातावरण व हवामानावर होणारा परिणाम अभ्यासत आहेत. मूळचे तिरुअनंतपुरमचे असलेले डॉ. सतीश हे सध्या बंगळूरुच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या संस्थेत वातावरण व महासागर विज्ञान केंद्रात प्राध्यापक असून दिवेचा सेंटर फॉर क्लायमेट चेंज या संस्थेचे ते संचालक आहेत. कार्बनच्या सूक्ष्म कणांपासून सध्या मानवाला मोठा धोका असून हवामान बदलांमागेही ते एक मोठे कारण आहे. सध्या दिल्लीत प्रदूषणामुळे जी समस्या निर्माण झाली आहे त्याची बीजेही या सूक्ष्म कणांमध्येच आहेत. या धोक्याचा मुकाबला वेळीच करणे आवश्यक असून त्यात डॉ. एस. के. सतीश यांचे संशोधन उपयोगी ठरणार आहे. केरळ विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर त्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथून पीएच.डी. केली. नंतर ते अमेरिकेला गेले. अमेरिकेत अनेक संधी उपलब्ध असतानाही त्यांनी भारतात परत येऊन इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या संस्थेत काम सुरू केले. मानवनिर्मित काजळी सूर्यप्रकाश शोषून घेते, त्यामुळे वातावरणातील तापमान वाढते, हे त्यांनी दाखवून दिले. १९९९ मध्ये इंडियन ओशन एक्सपरिमेंट या आंतरराष्ट्रीय प्रयोगात ते सहभागी होते. अरबी समुद्र व सहारातील एरोसोल कणांमुळे मान्सूनवर कसा परिणाम होतो, हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. नासाच्या गोडार्ड फ्लाइट सेंटरचे ते फेलो असून शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, राजीव गोयल पुरस्कार यांसारखे अनेक पुरस्कार त्यांना यापूर्वी मिळाले आहेत.

Story img Loader