आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९९५ साली त्यांनी दूरचित्रवाहिनीवरील ‘अम्मा अ‍ॅण्ड फॅमिली’ या मालिकेचे लेखन केले आणि तीन वर्षांनी एका मालिकेची निर्मिती केली. पुढे एका मालिकेत त्यांनी अभिनयही केला.. मात्र त्यापलीकडे बऱ्याच काही असलेल्या सादिया यांची बहुमुखी प्रतिभा थक्क करणारी होती.

नावातूनच दिल्लीशी नाते जोडलेल्या सादिया देहलवी या एका प्रथितयश इंग्रजी दैनिकाच्या स्तंभलेखक होत्या, शिवाय इतर हिंदू, उर्दू व इंग्रजी नियतकालिकांत त्या लेखन करत. त्या उत्तम रसज्ञ होत्या आणि दिल्लीच्या खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणारे पुस्तकही त्यांनी लिहिले. महिला, अल्पसंख्याक, इस्लामी अध्यात्म आणि दिल्लीचा वारसा व संस्कृती या विषयांवर त्यांनी चार दशकांहून अधिक काळ लेखन केले. त्यांच्या आजोबांनी सुरू केलेल्या उर्दूतील प्रख्यात ‘शमा’ नियतकालिक समूहातील महिलांसाठीच्या ‘बानो’ मासिकाचे त्यांनी काही वर्षे संपादन केले. १९८७ साली हे मासिक बंद झाले.

सादिया यांच्याकडे गोष्टी सांगण्याचे अनोखे कौशल्य होते. दिल्लीच्या ‘तहजमीब’बद्दल त्या इतक्या आत्मीयतेने बोलत, की त्यातून त्या श्रोत्यांना भूतकाळातल्या दिल्लीत नेऊन सोडत. पाककलेत त्या निपुण होत्याच. पाककृतींबाबतही त्या गोष्टीरूपात बोलत. लेखनातून त्यांनी दिल्लीतील मोगल खाद्यप्रकार लोकप्रिय केले.  सूफी पंथाच्या अनुयायी असलेल्या सादियांनी या तत्त्वज्ञानाची ओळख करून देण्यासाठी दोन पुस्तके लिहिली. ‘सूफीझम : दि हार्ट ऑफ इस्लाम’मध्ये त्यांनी इस्लाममधील सूफी परंपरा आणि या पंथाच्या प्रेम, सहिष्णुता व भ्रातृभाव या संदेशाचे महत्त्व सांगितले; तर ‘दि सूफी कोर्टयार्ड : दर्गाज ऑफ देल्ही’मध्ये दिल्लीचा सूफी इतिहास मांडला. इस्लामचा कट्टरवादी अर्थ लावण्यावर टीका करतानाच, सूफी पंथातील सहिष्णू व समन्वय वृत्तीचा त्या पुरस्कार करत राहिल्या.

दिवंगत बहुआयामी लेखक खुशवंतसिंग यांच्याशी सादियांची मैत्री इतकी की, सिंग यांनी ‘नॉट अ नाइस मॅन टू नो’ हे पुस्तक सादियांना अर्पण केले होते. याशिवाय, ‘मेन अ‍ॅण्ड विमेन इन माय लाइफ’ या खुशवंतसिंगांच्या पुस्तकातले एक प्रकरण सादिया यांच्यावर होते आणि पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सादियांचे छायाचित्र!

सादियांचे दिल्लीशी अतूट नाते होते. मुळात व्यापारी असलेल्या त्यांच्या घराण्याने सतराव्या शतकाच्या सुरुवातीला या शहरात स्थायिक झाल्यावर ‘देहलवी’ नाव घेतले.  या कुटुंबाची ‘शमा कोठी’ हे दिल्लीचे सांस्कृतिक केंद्रच होते. जीवनाबद्दलच्या प्रेमामुळे सादिया सतत उत्साही असत. रूढीप्रियता आणि कर्करोग या दोन्हींशी त्या गेल्या आठवडय़ापर्यंत लढल्या आणि अखेर ६३व्या वर्षी कर्करोगाने त्यांच्यावर मात केली.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sadia dehlvi profile abn