नवनाथ सोपान गोरे. एका रात्रीत साहित्य विश्वात प्रसिद्धीच्या झोतात आलेले नाव. तीन दशकांमधल्या पावसाळ्यांपेक्षा उन्हाळेच अधिक पाहिलेला हा तरुण. दोन वेळची भाकरी मिळणे हीच दिवसातील मोठी कमाई असे समजणाऱ्या नवनाथ यांनी आपल्या वाटय़ाला आलेल्या दारिद्रय़ाचे उदात्तीकरण करण्यापेक्षा अनुभवाची दाहक वास्तवता शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न ‘फेसाटी’च्या पानावर केला आहे. साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार ‘फेसाटी’ या त्यांच्या कादंबरीला जाहीर झाला, पण निगडी खुर्द या छोटय़ाशा गावाला त्याचा पत्ताच नव्हता.
सांगली जिल्ह्य़ाचा दुष्काळी भाग म्हणून गणल्या गेलेल्या आणि कर्नाटकशी नित्याचा संपर्क असलेले निगडी खुर्द हे चार-पाचशे उंबऱ्यांचे गाव. या गावात मेंढीपालन करून जगणारे हे गोरे कुटुंब. या मेंढपाळ कुटुंबाचा परिस्थितीशी केवळ जगण्यासाठी चाललेला झगडा. ‘फेसाटी’चा नायक नाथा याच्या आयुष्यापेक्षा एकूण या समाजाचा सुरू असलेला जगण्याचा संघर्ष या कादंबरीत पानोपानी दिसून येतो. शिकलास तर भले होईल, हा आईचा हट्ट होता. नवनाथ यांना तो पुरा करायचा होता. त्यासाठी जगण्याशी अतिशय तीव्र संघर्ष करत ते शिकायला लागले. घरात दारिद्रय़ मांडून ठेवलेले. घरात नऊ भावंडं. नवनाथ सगळ्यात धाकटे. पोटासाठी मेंढय़ा पाळायच्या किंवा मोलमजुरी करायची. पण पोटातली आग शमवण्यासाठी तेवढं पुरेसं नव्हतंच. अशाही परिस्थितीत त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. आता पदव्युत्तर शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठात प्रवेशही घेतला. जगण्याचे हे ओझे दूर तर होणार नाही, पण निदान हलके तरी होईल, म्हणून हे सगळं जगणं लिहून काढावे, असे त्यांना वाटले. जगण्याच्या दु:खाचा डोंगरच एवढा मोठा होता की, तो उतरवण्यासाठी? लेखणीशिवाय दुसरे साधनही हाताशी नव्हते. लिहिणे हीच त्यामागची खरी प्रेरणा. ‘फेसाटी’ ही खरीखुरी गोष्ट आहे. जे सांगायचे आहे, ते जर तुम्हाला समजले असेल, तर ते लिहिताना काहीच वेगळे करावे लागत नाही. सारे काही आपोआप कागदावर उतरत जाते. साहित्याच्या शैलीशास्त्राचा हा नियम नवनाथ यांच्या लेखनामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाला. जगावेगळे करण्यापेक्षा जगण्याच्या अनुभवाचेच कलाकृतीत रूपांतर होतानाची ही प्रक्रिया नवनाथ यांच्यासाठी वेगळी नव्हती. ते लिहित गेले एवढेच घडले आणि त्यातून सच्चाईचा एक अपूर्व अनुभव वाचकांपर्यंत पोहोचला. पहिल्याच प्रयत्नाला साहित्य अकादमीने दिलेली दाद नवनाथ यांच्यासाठी अप्रुपाची असणे स्वाभाविकच होते. अकादमी पुरस्कार मिळाला, पण नवनाथ यांच्यापुढे आजही नोकरीची आणि भाकरीची चिंता आ वासून उभीच आहे.