बोइंग. मोठमोठी विमाने तयार करणारी जगातील अव्वल कंपनी. या अमेरिकन कंपनीच्या उपाध्यक्षपदी दिनेश केसकर यांच्या रूपात मराठी माणूस यापूर्वीच विराजमान आहे. तिच्या भारतातील व्यवसायाची प्रमुख धुरा आता आणखी एका मराठी माणसाकडे आली आहे. सलील गुप्ते हे ते नाव आहे.
भारतातील खुद्द एअर इंडिया ही सरकारी तसेच अनेक खासगी विमान कंपन्यांच्या ताफ्यात बोइंगने तयार केलेली अनेक बडी विमाने आहेत. भारताबद्दलचा अमेरिकेचा आकस सर्वश्रुत असतानाच अमेरिकन कंपनीच्या महत्त्वाच्या पदावर पुन्हा एकदा भारतीय व्यक्तीची नियुक्ती होणे यातच वैशिष्टय़ आहे. सलील गुप्ते यांच्या नावामुळे तर मराठी माणसाचा ऊर अधिक भरून येणे क्रमप्राप्त आहे. भविष्यातील भारताची विमानांसाठीची गरज केसकर अनेकदा त्यांच्या मायदेशी दौऱ्यानिमित्त मांडत असतात. ती पूर्ण करण्यासाठी आता त्यांनाही योग्य आणि भक्कम साथ सलील यांच्यामुळे मिळणार आहे.
सलील गुप्ते हे बोइंग परिवारातीलच. सध्या ते बोइंगच्या कॅपिटल कॉर्पोरेशन या समूहाच्या वित्त उपकंपनीची उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी हाताळत आहेत. येत्या महिन्यात ते नव्या पदाचा कार्यभार हाती घेतील.
येथील हवाई वाहतूक कंपन्यांना प्रवासी विमाने पुरविण्याबरोबर देशातील संरक्षण, अंतराळ तसेच सुरक्षाविषयक क्षेत्रातील कंपनीचे कार्य ३,००० कर्मचाऱ्यांच्या सहयोगाने विस्तारण्यावर त्यांचा भर असेल. येत्या महिन्यातच त्यांच्या बोइंग परिवारातील अस्तित्वाची दशकपूर्ती होईल. बोइंगमध्ये नव्या नेतृत्वापूर्वी त्यांनी पुरवठा संचालक, वाणिज्यिक संचालक, व्यवस्थापकीय संचालक आदी पदे विविध कंपन्यांच्या विविध व्यवसाय गटांचे नेतृत्व करताना भूषविली आहेत. बोइंगच्या एफ-१५ या लढाऊ विमानाची जडणघडण सलील यांच्या देखरेखीखाली झाली आहे. व्यापारी तसेच सैन्यदलात लागणाऱ्या विमानांची बांधणी सलील यांच्या पुढाकाराने यापूर्वी झाली आहे.
सलील हे बोइंगपूर्वी गोल्डमन सॅक्स तसेच सिटीग्रुपसारख्या आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांमध्ये कार्यरत होते. २००६ ते २००९ दरम्यानच्या गोल्डमन सॅक्समधील कालावधीत त्यांच्याकडे आपत्कालीन स्थितीतील गुंतवणुकीची जबाबदारी होती. २५ अब्ज डॉलरच्या मुख्य गुंतवणूक निधीचे व्यवस्थापन त्यांच्याद्वारे हाताळले जात होते, तर सिटीग्रुपमधील तीन वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी बँकांमधील गुंतवणुकीचे धोरण अनुसरताना हवाई क्षेत्रासह वित्त क्षेत्रातील तब्बल २६ व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण केले.
सेवेची अधिकतर वर्षे अमेरिकेतच व्यतीत केलेल्या सलील यांचे उच्च शिक्षणही पाश्चिमात्य देशातच झाले आहे. कॉर्नेल विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयातील पदवी घेतल्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून व्यवसाय व्यवस्थापनातील शिक्षण घेतले. नेबरकेअर हेल्थसारख्या आरोग्य क्षेत्रातील कंपनीच्या कार्यकारी समितीवर राहताना त्यांनी वित्त समितीचे अध्यक्षपदही भूषविले. सलील यांची पत्नी निकोल नेरोलिअस या पूर्वाश्रमीच्या पत्रकार असून महिला, शिक्षण, आरोग्य हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षणादरम्यानच त्यांची सलील यांच्याबरोबर ओळख झाली. गुप्ते दाम्पत्यास दोन मुले आहेत.