मुस्लीम महिलांना त्यांच्या आयुष्यात इतरांच्या तुलनेने संधी कमी मिळतात पण आसामच्या सलमा हुसेन हिला मात्र नियतीने चांगली संधी दिली. अजून विधि महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षांत शिकत असतानाच तिला अमेरिकेतील अ‍ॅण्डी नेतृत्व निर्माण संस्थेत काम करण्याची संधी मिळाली आहे. कामरूप जिल्ह्य़ाच्या सोनतलीसारख्या छोटय़ाशा गावातून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेली ही मुलगी आता वॉशिंग्टनला जाईल, तेव्हा ब्रह्मपुत्रच्या रोरावत्या लहरी अंगावर झेलत निसर्गाच्या रौद्र रूपाचा सामना केलेल्या सलमाला एक वेगळे जग खुले होणार आहे. वयाच्या आठव्या वर्षी तिचे वडील वारल्यानंतर शिक्षक असलेली आई रेझिया हुसेन हीच तिची खरी गुरू ठरली. तिने प्रतिकूल परिस्थितीत मुलीला शिकवले, तिच्यात सेवा व स्पर्धात्मकतेचे स्फुलिंग चेतवले.

अ‍ॅण्डी नेतृत्व संस्थेच्या यंग विमेन पीस बिल्डर्स कार्यक्रमासाठी तिने जो अर्ज भरला त्यात तो जवळपास आयएएसची परीक्षा देण्याइतका अवघड होता; कारण त्यात अनेक प्रश्नांवर अभ्यासपूर्वक मते व्यक्त करायची होती. जगभरातून फक्त आठ तरुणींना या कार्यक्रमासाठी निवडण्यात आले, त्यात ती भारतातून एकमेव आहे.  सलमाने त्या संस्थेचा अर्ज खुबीने तर भरला, त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीही होऊन तिची निवड झाली. ५ ऑगस्टपासून शांतता प्रशिक्षणात ती सहभागी होणार आहे. नॅशनल फाऊंडेशन ऑफ इंडियाचा युवा शांती पुरस्कार तिला २०१७-१८ मध्ये मिळाला होता. अमेरिकेतील अ‍ॅण्डी फाऊंडेशन ही २००८ मध्ये स्थापन झालेली संस्था आहे, ती अशा महिलांना प्रशिक्षण देते ज्या मानवतावाद, राजनीती यांसारख्या क्षेत्रात चांगले काम करतात. अ‍ॅण्डी पामोविच ही एक युवकांना प्रेरणा देणारी महिला होती, तिच्या नावे ही संस्था सुरू केली गेली. तिचा इराकमध्ये मानवतावादी काम करत असताना २००७ मध्ये मृत्यू झाला. अ‍ॅण्डीचा आदर्श पुढे नेणाऱ्या महिलांमध्ये आता सलमाचा समावेश झाला आहे, ही अभिमानाची बाब आहे.  सध्याचे जग संघर्षांने व्यापलेले आहे. सीरियासह अनेक ठिकाणी यादवी माजलेली आहे, अशा परिस्थितीत शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या मानवतावादी कार्यकर्त्यांमध्ये सलमाचा समावेश आहे. आता वॉशिंग्टनमध्ये तिची गाठ देशोदेशीच्या मानवी हक्क कार्यकर्त्यांशी पडणार आहे, आसाममधील एक खेडे दत्तक घेऊन तेथे शांतता निर्माण करण्याचा तिचा मानस आहे. मानवी हक्क व शांतता क्षेत्रातील धडाडीची कार्यकर्ती अशी तिची ओळख आता निर्माण झाली आहे. २०१७ मध्ये त्रिपुरातील आयसीएफएआय विद्यापीठातील कार्यक्रमात तिला ‘राइट्स ऑफ एल्डरली पर्सन्स’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले होते.

Story img Loader