अकिलन संकरन या १४ वर्षे वयाच्या मुलाने संगणकशास्त्राची जी विशेष कामगिरी गणिताच्या मदतीने केली, ती मोबाइलवर जी उपयोजने असतात त्यांचा वेग वाढवणारी ठरणार आहे. या कामगिरीबद्दल त्याला २५ हजार डॉलर्सचा ‘सॅम्युएली फाऊंडेशन पुरस्कार’ मिळाला आहे. अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील अल्बुकर्क गावात पालकांसह राहणाऱ्या अकिलनची गणितज्ञ हीच ओळख लहान वयात असली तरी त्याच्या आवडीनिवडी त्याने सोडलेल्या नाहीत. तो पियानो छान वाजवतो, बासरी व ड्रम ही वाद्येही तो तितक्याच सुरावटीत वाजवतो. विज्ञान व अभियांत्रिकीत त्याने माध्यमिक शाळेतच प्रावीण्य मिळवले. मोबाइल उपयोजनांसाठी त्याने जी आज्ञावली तयार केली आहे त्यात प्रतिमूलसंख्यांचा वापर केला असून या संख्या अशा आहेत ज्या हजार अंकांपेक्षा अधिक अंक असलेल्या संख्यांनी भागल्या जाऊ शकतात. त्याने संख्यांच्या भागाकाराच्या विश्लेषणाची एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात रोज या संख्या वापरत असतो, पण त्यावर विचार करीत नाही असे अकिलन याने त्याच्या सादरीकरणात म्हटले आहे. आपली एक नैसर्गिक प्रवृत्ती असते ती म्हणजे काही गोष्टी वेगवेगळय़ा लहान गटांत विभागण्याची. उदाहरणार्थ, ६० ही जास्त भाग जाऊ शकणारी संख्या. आपण तिचा वापर वेळाच्या सेकंद, मिनिट, तास या विभागणीसाठी करीत असतो. अकिलनला खगोलभौतिकशास्त्रज्ञ व्हायचे आहे. त्याला मिळालेला ‘सॅम्युएली फाऊंडेशन पुरस्कार’ हा अमेरिकेतील ‘सोसायटी फॉर सायन्स’ या संस्थेने विद्यार्थ्यांमधील प्रज्ञाशोधासाठी राबवलेल्या ‘ब्रॉडकॉम मास्टर्स’ या स्पर्धात्मक उपक्रमातील पाच बक्षिसांपैकी सर्वात मोठय़ा रकमेचा पुरस्कार. एकूण १८०० विद्यार्थ्यांमधून त्याची निवड झाली आहे. अंतिम फेरीतील विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रकल्प सादर केले होते. ही स्पर्धा आभासी पातळीवर झाली. त्यात त्यांच्या समीक्षात्मक विचारांचा, संज्ञापनाचा, सर्जनशीलतेचा व सहकार्य शैलीचा आढावा घेण्यात आला. याच स्पर्धेत कॅमेलिया शर्मा या मुलीला फिशपॉप एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने माशांची मोजणी करण्याच्या तंत्रासाठी; तसेच प्रिशा श्रॉफ या विद्यार्थिनीला कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर करून वणवे रोखण्याच्या उपायांसाठी प्रत्येकी दहा हजार डॉलरचे पुरस्कार मिळाले. गेल्या वर्षी या स्पर्धेतील पहिला पुरस्कार इशाना कुमार हिला मिळाला होता. तिने काल्पनिक रंगांच्या मानवी आकलनावरून डोळय़ाच्या रोगांवर संशोधन केले होते.