आजच्या काळात ज्या भारतीय इतिहासकारांची नावे विचारसरणीच्या बंधनापलीकडे जाऊन घ्यावीत अशांपैकी एक म्हणजे संजय सुब्रह्मण्यम. त्यांना नुकताच इस्रायलचा प्रतिष्ठेचा ‘डॅन डेव्हिड पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांचे इतिहासातील काम हे आधुनिक कालखंडाशी निगडित असून आशियाई, युरोपीय व उत्तर- दक्षिण अमेरिकेतील लोकांच्या आंतरसांस्कृतिक संबंधांवर हे संशोधन आहे. सुब्रह्मण्यम हे लॉस एंजलिसमधील कॅलिफोर्निया विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक. धोरण-विश्लेषक के. सुब्रह्मण्यम यांचे ते पुत्र, तर माजी परराष्ट्र सचिव एस.जयशंकर यांचे बंधू आ हेत. ‘स्थूल इतिहासातील भूतकालीन पैलू’ या प्रवर्गात त्यांना हा १० लाख डॉलर्सचा (७.११ कोटी रुपये) पुरस्कार प्रा. केनेथ पोमेरांझ यांच्या समवेत विभागून मिळाला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, मानव्यविद्याशाखा यांत उल्लेखनीय काम करणाऱ्यांना दरवर्षी तीन डॅन डेव्हिड पुरस्कार दिले जातात. हा पुरस्कार इस्रायलच्या तेल अवीव विद्यापीठामार्फत दिला जातो. संजय सुब्रह्मण्यम हे दिल्ली विद्यापीठाचे माजी विद्यार्थी. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेतून डॉक्टरेट केल्यानंतर त्यांनी आर्थिक इतिहासकार म्हणून काम सुरू केले. पण नंतर ते राजकीय, बौद्धिक व सांस्कृतिक इतिहासाकडे वळले. कॅलिफोर्निया विद्यापीठात ते समाजविज्ञानातील ‘आयर्विग व जीन स्टोन अध्यासना’चे प्रमुख आहेत. २००४ पासून ते तेथे कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांना इतिहासातील योगदानासाठी इन्फोसिस पुरस्कारही मिळाला आहे.  आतापर्यंत लेखक अमिताव घोष, संगीतकार झुबिन मेहता,  रसायनशास्त्रज्ञ सीएनआर राव व खगोलशास्त्र प्राध्यापक श्रीनिवास कुलकर्णी यांना हा पुरस्कार मिळाला आहे. सुब्रह्मण्यम हे इतिहासकार व  लेखक रामचंद्र गुहा यांचे महाविद्यालयीन सहाध्यायी आहेत. विशेष म्हणजे या दोघांचेही शिक्षक असलेल्या धर्माकुमार यांनी त्यावेळीच संजय सुब्रह्मण्यम हे खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचे इतिहासकार आहेत असे म्हटले होते. त्यांची प्रतिभा बहुआयामी आहे यात शंका नाही. अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. उत्कृष्ट विश्लेषण क्षमता, आंतरविद्याशाखीय अभ्यास त्याला साहित्य शैलीची जोड यामुळे त्यांचे इतिहास लेखन वेगळे आहे. त्यांच्या सगळ्या पदव्या अर्थशास्त्रातील असल्या तरी आशियाई, युरोपीय,  वसाहतकालीन अमेरिकी यांच्यातील इस १४०० ते १८०० दरम्यानचे सांस्कृतिक व इतर व्यवहार यावर त्यांचा भर आहे. जागतिक इतिहास, इस्लामी इतिहास यापैकी एका क्षेत्रात आणखी अभ्यास करण्याचा त्यांचा इरादा आहे. या पुरस्कारामुळे आपल्याला पुढील वाटचालीसाठी प्रेरणाच मिळाली आहे, असे समाधान  सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा