सैन्यदलांमध्ये बहुतेकदा यशस्वी म्हणवले गेलेले अनेक अधिकारी स्वभावाने बेधडक आणि काही बाबतींमध्ये बेफिकीर आढळून आलेले आहेत. साहस आणि मोहीम यशस्वी करण्यासाठी अत्यावश्यक असा आत्मविश्वास या मंडळींकडे भरपूर आढळून येतो. हे साहस आणि जबाबदारी किंवा उत्तरदायित्व यांच्यातील समाजाने वा सरकारने आखून दिलेली सीमारेषा सहसा त्यांना कबूल नसते. नुकतेच ८१व्या वर्षी निवर्तलेले अमेरिकी नौदलातील अधिकारी रिचर्ड मार्सिन्को अशा अधिकाऱ्यांपैकी एक. हे व्यक्तिमत्त्व वादातीत नाही. नौदलातून निवृत्त होतानाच्या काळात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांचे मतभेद झाले होते. काही काळ स्वारी तुरुंगातही जाऊन आली. परंतु ‘नेव्ही सील सिक्स’ हे अत्यंत सक्षम आणि धाडसी असे दहशतवादविरोधी पथक तयार करण्याचे श्रेय सर्वस्वी त्यांचेच. मार्सिन्कोने हे पथक घडवताना घेतलेले अपार कष्ट भविष्यात याच पथकाने ओसामा बिन लादेनचा खात्मा करताना आखलेल्या अत्यंत धाडसी आणि कल्पक मोहिमेत प्रत्यक्षात उतरलेले दिसून आले. आज कोणत्याही देशाच्या सैन्यदलात दहशतवादविरोधी अशी सक्षम यंत्रणा व नेतृत्व असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. असे काही पथक असले पाहिजे याविषयी दस्तुरखुद्द महाबलाढय़ अमेरिकेतच अनभिज्ञता होती. या अनभिज्ञतायुक्त फाजील आत्मविश्वासाला पहिला धक्का बसला इराणमधील अमेरिकी दूतावासाला १९७९मध्ये पडलेल्या वेढय़ानंतर. दूतावासातील ५२ अधिकारी व नागरिक जवळपास ओलीस ठेवले गेले आणि या कृत्याला इराणमध्ये त्या वेळी नव्याने स्थापन झालेल्या धर्मसत्तेचा पाठिंबा होता. त्यांच्या सुटकेसाठी अमेरिकेने हाती घेतलेली ‘ऑपरेशन ईगल क्ल़ॉ’ मोहीम अपयशी ठरली. या मोहिमेसाठी आवश्यक शीघ्रगतीने हालचाली करू शकेल अशा कमांडो पथकाची उणीव अमेरिकेला प्रकर्षांने जाणवली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा