एखाद्या दुबळ्या संघाची भीती का बाळगावी, हा अतिआत्मविश्वास फ्रान्ससारख्या गतजगज्जेत्या संघाला २००२च्या फिफा विश्वचषकात महागात पडला होता. आंतरराष्ट्रीय नकाशावर छोटय़ाशा ठिपक्यासारख्या असलेल्या सेनेगल या लिंबूटिंबू आफ्रिकी देशाने त्या विश्वचषकात सुरुवातीलाच खळबळ उडवून दिली होती. १९९८च्या जगज्जेत्या फ्रान्सला सलामीलाच पराभवाचा धक्का देत त्यांचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आणण्याची किमया सेनेगलने केली! फ्रान्सवर ही नामुष्की ओढवण्यासाठी कारणीभूत ठरला होता तो सेनेगलचा मध्यरक्षक पापा बौबा डिऑप. त्याच्या निर्णायक गोलमुळे फ्रान्सला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि या पराभवाने खचलेल्या फ्रान्सला नंतर आपली कामगिरीच उंचावता आली नाही. याच डिऑपने वयाच्या ४२व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने जगाचा निरोप घेतला. पण कर्दनकाळ म्हणून फ्रान्सवासीयांसाठी तो सदैव स्मरणात राहील. त्याच विश्वचषकात डिऑपच्या कामगिरीमुळेच, सेनेगल हा फिफा विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा आफ्रिकेतील कॅमेरून (१९९०) नंतरचा दुसरा देश ठरला. यामुळे डिऑपला आपल्या देशात महान फुटबॉलपटूचा दर्जा मिळाला. त्याच वर्षी सेनेगलने आफ्रिकन देशांच्या फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारण्याची किमया केली. मात्र जेतेपद उंचावण्याचे सेनेगलचे स्वप्न कॅमेरूनकडून पेनल्टी-शूटआऊटमध्ये धुळीस मिळाले. सेनेगलची राजधानी डकारमध्ये जन्मलेल्या डिऑपने कारकीर्दीच्या सुरुवातीला एएससी डायरफचे प्रतिनिधित्व केले. पुढील तीन मोसम तो स्वित्र्झलडच्या क्लबकडून खेळला. २००२मध्ये फ्रेंच लीग फुटबॉलमध्ये लेन्सकडून खेळणाऱ्या डिऑपला फिफा विश्वचषकामुळे खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. २००४ साली फुलहॅममध्ये सामील झाल्यानंतर मधल्या फळीतील आपल्या दमदार खेळाने त्याने इंग्लिश प्रीमियर लीगच्या महान खेळाडूंत स्थान मिळवले. वयाच्या २१व्या वर्षीपासून देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डिऑपने २००१ ते २००८ या कालावधीत ६३ आंतरराष्ट्रीय सामन्यांत सेनेगलकडून खेळताना ११ गोल लगावले. चारदा आफ्रिकन नेशन्स चषक स्पर्धेतही त्याने २००२मध्ये सेनेगलला अंतिम फेरी गाठून दिली. २००७मध्ये पोर्टमाऊथशी करारबद्ध होऊन, २००८ साली एफए चषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. वेस्ट हॅम युनायटेड आणि बर्मिगहॅम सिटीमध्ये फार काळ न टिकलेल्या डिऑपने २०१३मध्ये व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्ती पत्करली. साडेसहा फूट उंचीचा हा हसतमुख खेळाडू आजारी पडणे आणि त्याचे अकालीच निधन होणे, हे चटका लावणारे ठरले.

Story img Loader