भांडवली बाजारपेठेतील गुंतवणुकीचे नियम सामान्य लोकांना माहिती नसतात, त्यातून अनेकदा आर्थिक घोटाळे होतात, त्यासाठी गुंतवणूकदारांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे काम गेली पंचवीस वर्षे अव्याहतपणे रोखे व विनिमय मंडळ (सेबी) करीत आहे. या महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी अजय त्यागी यांची नुकतीच निवड झाली. ते आधी अर्थ मंत्रालयात अतिरिक्त सचिव होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने त्यागी यांच्या नियुक्तीस मान्यता दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहारा घोटाळ्यात अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली होती त्यात गुंतवणूकदारांना सेबीचा मोठा आधार मिळाला. त्यामुळे या संस्थेचे महत्त्व वेगळे सांगायची गरज नाही. सामान्य गुंतवणूकदाराची ताकद असे बिरुद मिरविणाऱ्या सेबीपुढे भांडवली बाजारावरील या विश्वासाला सार्थ ठरविण्यासाठी सजग राहावे लागेल. अजय त्यागी यांचे नाव आपल्याला नवीन असले तरी प्रशासकीय कामाचा त्यांचा अनुभव मोठा आहे. तेल व नैसर्गिक वायू महामंडळात काम करताना त्यांनी पीएनजीआरबी कायद्यातील नियमावली तयार करण्याचे काम केले होते.  पेट्रोलियम व नैसर्गिक वायू खात्यात त्यांनी सहसचिव म्हणून पाच वर्षे काम केले. हिमाचल प्रदेशातही त्यांनी अर्थ, माहिती तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी सांभाळली होती. काही काळ ते रिझव्‍‌र्ह बँकेच्या संचालक मंडळावरही होते. ५८ वर्षांचे त्यागी हे अर्थशास्त्र व संगणक विज्ञानात पदव्युत्तर पदवीधारक आहेत. लोकप्रशासन या विषयात ते हार्वर्डचे पदव्युत्तर पदवीधारक असून इलेक्ट्रॉनिक्सचे पदवीधरही आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असून कुठलेही काम तडीस नेण्याचा त्यांचा निर्धार असतो. सेबीच्या माध्यमातून आर्थिक सुधारणांना जेवढे पाठबळ देणे शक्य आहे तेवढे ते देतील अशा अपेक्षा त्यांच्या या नियुक्तीत आहेत. अर्थ मंत्रालयात त्यांनी गुंतवणूक , भांडवली बाजारपेठ, द्विपक्षीय संबंध व चलन अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या असल्याने आर्थिक व्यवहारातील खाचाखोचा त्यांना माहिती आहेत. नाणेनिधी धोरण समितीची स्थापना, नोटाबंदी, कंपनी रोखे, बाजारपेठ, परदेशी गुंतवणूक या क्षेत्रांत त्यांनी निर्णय घेण्यात भूमिका पार पाडली आहे.

१९८४ मध्ये प्रशासकीय सेवेत दाखल झालेले अजय त्यागी हे हिमाचल प्रदेश केडरचे अधिकारी असले तरी ते मूळ उत्तर प्रदेशातील आहेत. रिझव्‍‌र्ह बँक व महारत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या तेल व नैसर्गिक वायू महामंडळाच्या संचालक मंडळात त्यागी यांनी सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे. १८ फेब्रुवारी २०११ रोजी सेबी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेले यू के सिन्हा यांच्याकडून त्यागी हे येत्या १ मार्च रोजी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील.

सेबीच्या अध्यक्षपदावर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वर्चस्व राहिले आहे. सेबीच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले ९ पैकी ७ अध्यक्ष हे प्रशासकीय अधिकारी होते. सेबीच्या अध्यक्षपदी सर्वाधिक काळ राहिलेल्या डी. आर. मेहता यांच्यानंतर दुसरी सर्वाधिक कारकीर्द असलेल्या सिन्हा यांना दोन वेळा मुदतवाढ मिळाली.  सेबीच्या अध्यक्षपदी निवड होण्यासाठी ५० ते ६० वर्षेदरम्यान वय व २५ वर्षे भांडवली बाजाराचा अनुभव असणे आवश्यक होते. त्यागी हे प्रशासकीय अधिकारी असले तरी त्यांची आर्थिक जाणकारी खूप जास्त आहे. शिवाय डिजिटल व इलेक्ट्रॉनिक व्यवहारांचा अलीकडचा कल बघितला तर त्यांचे तंत्रज्ञानावरही प्रभुत्व आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणात सेबीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना ते न्याय देतील यात शंका नाही.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior ias officer ajay tyagi appointed sebi chief
Show comments