‘रंगभूषा म्हणजे केवळ चेहऱ्यावर रंग चढवणे नाही, तर त्या पात्राचे व्यक्तिमत्त्व रंगभूषेतून उभे राहिले पाहिजे,’ हे भान ठेवून नाटक- चित्रपट- मालिकांमधील पात्रांना ‘व्यक्तिमत्त्व’ देणारे पंढरीनाथ जुकर सोमवारी निवर्तले. नारायण हरिश्चंद्र जुकर हे त्यांचे मूळ नाव. परंतु ‘पंढरीदादा’ हेच नाव दिग्गज कलाकारांपासून ते नवख्या कलाकारांपर्यंत सगळ्यांनाच जिव्हाळ्याचे वाटे. या क्षेत्रात ते योगायोगाने आले. वडील आजारी पडल्याने त्यांना शिक्षण सोडावे लागले. रंगभूषेचे गुरू बाबा वर्दम यांचे बोट पकडून त्यांनी राजकमल स्टुडिओमध्ये पहिले पाऊल ठेवले आणि रंगभूषेचा पहिलाच प्रयोग थेट चित्रपती व्ही. शांताराम यांच्यावर केला. ‘अमर भूपाळी’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यांच्या कौशल्याने पुढे त्यांना राजकमलमध्ये रंगभूषाकार म्हणून नोकरी मिळाली. त्यांच्या कलेने प्रभावित झालेल्या अभिनेत्री नर्गिस यांनीच दिग्दर्शक के. ए. अब्बास यांच्याशी जुकर यांचा परिचय करून दिला आणि ‘परदेसी’ चित्रपटाच्या निमित्ताने ते रशियात पोहोचले. त्यांच्या कामाची दखल घेत १९५७ ला रशिया सरकारने त्यांना फेलोशिप देऊ केली. रशियात ‘मेकअप आर्ट डिप्लोमा’ करून भारतात परतल्यावर मात्र, परदेशी शिकून आलेला कलाकार जास्त मानधन घेईल या भीतीने त्यांना जवळपास दीड वर्ष कोणी काम दिले नाही. दिग्दर्शक चेतन आनंद यांचा गौतम बुद्धांच्या आयुष्यावरला चित्रपट केवळ, बुद्धांप्रमाणे केशभूषा कोणत्याच रंगभूषाकाराला जमत नाही म्हणून अडणार की काय अशा स्थितीत, जुकर यांनी २४ तासांत असा विग (टोप) बनवला की चेतन आनंद यांनी त्यांना १२०० रुपये बक्षिसी दिली. महिना ७० रुपयांनी काम करणाऱ्या जुकर यांची ती मोठी कमाई होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजकमल, आर. के., यशराज, बालाजी यांसारख्या प्रथितयश निर्मिती संस्थांसोबत त्यांनी अनेक वर्षे काम केले. अभिनेत्री मीनाकुमारी यांच्या ‘ब्लॅक प्रिन्सेस’ या टोपणनावामागेही दादांचाच हात असल्याचे सांगितले जाते. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘चित्रलेखा’, ‘ताजमहल’, ‘नीलकमल’, ‘काला पत्थर’, ‘शोले’, ‘मिस्टर इंडिया’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ असे पाचशेहून अधिक चित्रपट त्यांनी केले. तर मीनाकुमारी, मधुबाला, देव आनंद, राजकुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, शाहरुख खान, विद्या बालन अशा कलाकारांच्या दोन पिढय़ांना त्यांच्या रंगभूषेचा परिसस्पर्श झाला. ‘पंढरीनाथ मेकअप अ‍ॅकेडमी’ आणि ‘स्टार इन्स्टिटय़ूट’ स्थापून त्यांनी रंगभूषाकारांची तरुण पिढी घडवली. राज्य शासनाच्या ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव’ (२०१३)सह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior make up artist pandhari juker profile zws