ध्यास घेऊन आयुष्य जगणारी काही माणसे असतात. मी करीन आणि मीच तडीस नेईन, ही त्यांची वृत्ती असते. अशाच पठडीतील कल्याणमधील ज्येष्ठ अधिवक्ता शांताराम दातार होते. परिस्थितीचे चटके सहन करीत शालेय शिक्षण आणि जीवनाचा काही काळ त्यांनी व्यतीत केला. त्या परिस्थितीचे भान ठेवून ते उगवतीच्या दिवसात काटेकोर, चिकित्सक, सडेतोड आणि सरळ मार्गी पांथस्थ या वाटेवर कायम राहिले. संघाच्या संस्कारात ते वाढले. वकिली करताना समोरील आशिलाची मूठ किती मोठी यापेक्षा त्या अशिलाला न्याय कसा मिळेल याकडे त्यांचा कटाक्ष असे. ही सामाजिक भान जपणारी मूल्ये त्यांनी वकिली व्यवसायात जपली. निकोप भावनेतून त्यांनी आपला पेशा सांभाळला. पिंड सामाजिक कार्याचा असल्यामुळे ते कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय मजदूर संघात सक्रिय होते. या माध्यमातून त्यांनी कामगारांचे प्रश्न शासन पातळीवर मांडले. कल्याणच्या वेशीवरील आधारवाडी कचराभूमी ही भविष्यात रहिवाशांची मोठी डोकेदुखी आणि रोगराईला आमंत्रण देणारी असेल, हे वीस वर्षांपूर्वी अचूक हेरून व्यक्तिगतरीत्या अ‍ॅड्. दातार यांनी ही कचराभूमी बंद करून कचरा टाकण्याची सोय अन्यत्र करावी म्हणून कल्याण जिल्हा न्यायालयात दावे दाखल केले होते. ते दावे जिंकलेही. पालिकेच्या बेरक्या आणि बेडर अधिकाऱ्यांनी कधी त्या आदेशाची दखल घेतली नाही. अखेर दातार यांचे म्हणणे खरे ठरून आता हा कचराभूमीचा प्रश्न पालिकेच्या आवाक्याबाहेर गेला आहे.

न्यायालयात इंग्रजीचा वापर असल्याने अशिलांना न्यायालयात आपल्या दाव्याबद्दल चाललंय काय हे कळत नाही. त्यामुळे न्यायालयात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर झाला पाहिजे म्हणून ते अनेक वर्षे शासन, न्यायालयीन पातळीवर लढा देत होते. या लढय़ात लोकसहभाग असावा म्हणून त्यांनी ‘मराठी भाषा संरक्षण आणि संवर्धन’ संस्था स्थापन केली. या लढाईमुळे शासनाला न्यायालयात मराठीच्या वापराचे अध्यादेश काढाव लागले. जिल्हा, तालुकास्तरीय न्यायालयात सुरू असलेला मराठीचा वापर हे दातार यांच्या लढय़ाचे यश आहे. ‘न्यायालयीन व्यवहार आणि मराठी भाषा’ पुस्तकात त्यांचे योगदान होते. अलीकडे शरीर थोडे साथ देत नव्हते. तरीही, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून साहित्य स्तरावर सुरू असलेल्या लढय़ाच्या अग्रभागी ते होते. शहरातील नागरी समस्यांवर ते उद्विग्न होत. ठाण्याचा सन्मित्रकार, सुभेदारवाडा संस्थेच्या शताब्दी पुरस्काराचे ते मानकरी होते. अनेक प्रश्न तडीस लावून आणि काही सोडविण्याच्या वाटेवर असताना त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

Story img Loader