या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

‘एसडी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शरद कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातील आदिवासींचा एकही पाडा किंवा वस्ती पाहायची ठेवली नाही. या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अक्षरश: दीपस्तंभाप्रमाणे म्हणायला हवे. पण कोणत्याही समारंभात कधीही व्यासपीठावर विराजमान न होता, केवळ आपल्या कामाच्या परिघातच राहणारे एसडी हे एक वेगळेच रसायन होते. मूळ आवडीचा विषय अर्थशास्त्र. वकिलीची परीक्षाही दिलेली. पण सगळे आयुष्य केवळ आदिवासींच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीच व्यतीत करायचे, असे मनाशी पक्के ठरवून एसडींनी आदिवासी जाणीव जागृती केंद्राची स्थापना केली. तेव्हा गमतीने शबनमच्या पिशवीतील संस्था, असे म्हटलेही जायचे. पण खांद्यावरल्या शबनम बॅगेतील आदिवासींच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी जमवलेले कागदच त्यांचे आयुष्य व्यापून टाकणारे ठरले.

आजही आदिवासींचे प्रश्न ऐरणीवर येऊ शकत नाहीत आणि त्याकडे लक्ष वेधले जात नाही. परंतु एसडी मात्र गेली सुमारे चाळीस वर्षे केवळ आदिवासींना त्यांचे हक्क कसे मिळतील, याच विवंचनेत होते. वनसंरक्षण कायदा तयार करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रक्रियेत ते सहभागी झाले, त्यामुळे युनायटेड नेशन्सच्या अभ्यासगटातही त्यांना भाग घेता आला. राज्यातील परिवर्तनवादी आणि विकासवादी संघटनांना कधीही कोणताही सल्ला हवा असला, तर एसडींच्या रूपाने एक पर्वतच पाठीशी उभा राहात असे. साधे पोस्ट कार्ड आले, की अमुक ठिकाणी शिबीर आहे म्हणून, तर एसडी शबनम अडकवून लगोलग तिथे पोहोचत. कार्यकर्त्यांना तासन्तास खिळवून ठेवण्याची अजब क्षमता त्यांच्यामध्ये होती. त्यांच्या कार्यपद्धतीचा हा सर्वात मोठा विशेष होता.

‘ग्रामायन’सारख्या संस्थेबरोबरच अनेक संस्थांमध्ये ते कार्यरत राहिले. त्यामुळे आदिवासींचे प्रश्न जगभरातील अनेक चर्चासत्रांमधून मांडण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यांनी त्यासाठी कधीही नकार दिला नाही. पावलो फ्रेअरी या जागतिक कीर्तीच्या शिक्षणतज्ज्ञाने लिहिलेल्या पुस्तकाचे रसाळ आणि सुबोध भाषांतर एसडींनी ‘जाणीवजागृती’ या नावाने प्रसिद्ध केले. ‘इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पोलिटिकल वीकली’ या नियतकालिकातही त्यांनी या विषयावर अनेक निबंध लिहिले. महाराष्ट्रातील आदिवासींचा त्यांनी केलेला अभ्यास जागतिक पातळीच्या संस्थांनाही उपयुक्त ठरला. त्यामुळे जगभरातील अशा संस्थांमध्ये त्यांना जाता आले. आदिवासींचा चालताबोलता महाकोश असणाऱ्या एसडींच्या कामाचे मूल्य सामाजिक पातळीवर फारच क्वचित झाले, मात्र त्याबद्दल त्यांना कधीच खंत वाटली नाही. आदिवासींना त्यांचे जगण्याचे अधिकार मिळाले पाहिजेत, यासाठी रस्त्यावर येऊन लढा करण्यापेक्षा वैचारिक पातळीवर लढाई करणे अधिक उपयुक्त ठरणारे असते, अशी त्यांची भावना असे.

सतत कामामध्ये स्वत:ला बुडवून घेणाऱ्या अशा ऋषितुल्य व्यक्तीच्या निधनाने या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळय़ांमध्ये आपले छत्र हरपल्याची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे.