विजयनगर साम्राज्यापासूनची परंपरा सांगणाऱ्या कुचिपुडी नृत्यशैलीत केवळ प्रावीण्य न मिळवता त्यांनी हा वारसा पुढल्या पिढीतील नर्तकांनाही दिला आणि सुमारे दीड हजार शिष्य घडविले. आधुनिक व्यक्तिवादी काळात अभिजात कला टिकवण्याची जबाबदारी अंतिमत: कलावंतावरच असते, ती त्यांनी निभावली. मात्र, गेल्या काही वर्षांपासूनच्या आजाराने त्यांना गाठलेच.. अवघ्या ६४ व्या वर्षी शोभा नायडू यांचे बुधवारी पहाटे निधन झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुचिपुडी हा भरतनाटय़म्च्या जवळचा, परंतु  मुद्रांपेक्षा भावदर्शनाशी, ‘यक्षगान’ लोकविधेच्या  कथनाशी, ओडिसीच्या लालित्याशी आणि मणिपुरी नृत्यशैलीतील मधुराभक्तीशी नाते सांगणारा नृत्यप्रकार. साधारण वयाच्या सहाव्या वर्षांपासून गुरू वेम्पटि चिन्न सत्यम् यांच्याकडे शोभा शिकू लागल्या आणि १९६९ मध्ये- वयाच्या तेराव्या वर्षी पहिले सादरीकरण त्यांनी केले. तेव्हापासून अनेकदा चित्रपट क्षेत्रातूनही संधी चालून आल्या, पण अगदी कमी वेळा, तेही गुरूंनी सांगितले म्हणूनच त्यांनी चित्रपटांसाठी नृत्य केले. सनदी अधिकारी अर्जुन राव यांच्याशी विवाहानंतरही कलेला अंतर न देता, त्यांनी देशविदेशांत दौरे केले. हाच काळ देशोदेशींच्या ‘फेस्टिव्हल ऑफ इंडिया’चा होता. अमेरिका तसेच व्हेनेझुएला, क्युबा, मेक्सिको या दक्षिण अमेरिकी देशांत, ब्रिटन, तुर्कस्तान, हाँगकाँग, दुबईत त्यांचे कार्यक्रम झाले. शास्त्रोक्त शिक्षणाला सादरीकरणाच्या भानाची जोड देणाऱ्या शोभा नायडू, बोलका चेहरा व डोळे यांमुळे नृत्य पाहण्याची सवय नसलेल्या प्रेक्षकांपर्यंत नृत्यातील भाव नेमका पोहोचवत. ‘भामाकलापम्’ सारखे नृत्यनाटय़ समीक्षकांनी विशेष गौरवले असले तरी प्रत्येक सादरीकरणात, अगदी सुरुवातीच्या गणेश वंदनेपासून नृत्त, कलापम या क्रमाने अखेरच्या ‘तरंगम्’ पर्यंत प्रेक्षक-श्रोत्यांना अभिजात अनुभव देण्यात त्यांनी कसूर केली नाही. वेम्पटि सत्यम् नृत्यालयाची हैदराबाद शाखा त्यांनी १९८० मध्ये  उघडली, तिचे प्रमुखपद त्यांनी २०१३ पर्यंत सांभाळले. १९९१ साली ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार, २००१ मध्ये ‘पद्मश्री’, नृत्य चूडामणि हा दक्षिण भारतातील प्रतिष्ठेचा पुरस्कार असे मानसन्मान त्यांना मिळाले, परंतु आजाराने जर्जर होईपर्यंत त्या नृत्य-ज्ञानदानाचे कार्य सातत्याने करीत राहिल्या होत्या.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shobha naidu profile abn