काबूल शहरात, म्हणजे अफगाणिस्तानच्या राजधानीत स्फोट घडवून माणसे मारण्याच्या घटना नव्या नाहीत. नेहमीचेच ते. पण अशाच एका स्फोटात अवतार सिंग खालसा यांच्यासारख्या समाजभावी व्यक्तीचा, अफगाण अल्पसंख्याकांच्या नेतृत्वाचा अंत होणे हे चुटपुट लावणारे आहे. अवतार सिंग हे धर्माने शीख पण जन्माने अफगाण. अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पक्म्तिया प्रांतातले त्यांचे घराणे. पण बालपणीच अवतार सिंग काबूलमध्ये राहू लागले. या शहराच्या ‘कलाचा’ या भागात त्यांचे घर. इथेच त्यांचा गुरुद्वाराही. ऐन उमेदीची सुमारे दहा वर्षे त्यांनी अफगाण सैन्यात सेवा केली. तालिबान-सद्दीच्या काळात सारेच संपल्यावर पुन्हा याच कलाचात ते परतले; पण ‘कछहु न सांडे खेत, सूरा सोही’ – शूर तोच, जो आपली भूमी कदापिही सोडत नाही- अशा निर्धाराने! त्यांच्या समाजकार्याला गेल्या १५ वर्षांत खरा बहर आला. कलाचा भागातील १२० वर्षे जुनी स्मशानभूमी (दहन-भूमी) हिंदू वा शिखांना वापरू दिली जात नाही, याविरुद्ध पोलीस आणि अन्य यंत्रणांकडे दाद मागणे त्यांनी सुरू केले. अफगाणिस्तानातील परदेशी पत्रकारांनाही गाठून, ‘आमच्या अंत्ययात्रांवर दगडफेक होते’ हे वास्तव त्यांनी जगासमोर आणले. अखेर, प्रत्येक अंत्ययात्रेला पोलीस संरक्षण मिळावे, अशी तजवीज प्रशासनाने केली. अफगाण प्रशासन अधिकाधिक सहिष्णु, सुसंस्कृत होण्याचा प्रयत्न करीत असताना, अफगाण टोळीप्रमुखांच्या ‘लोया जिरगा’ या सभागृहात अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी म्हणून अवतार सिंग यांना स्थान मिळाले. अर्थात, म्हणून त्यांचा संघर्ष थांबला नाही. केंद्रीय प्रशासन सहिष्णु झाले, पण स्थानिक पातळीवरील झगडे तसेच राहिले. हे सारे आता कदाचित बदलू शकेल, अशी आशा होती. ‘लोया जिरगा’ ऐवजी अफगाणिस्तानच्या पार्लमेंटात येत्या ऑक्टोबरपासून अवतार सिंग यांना स्थान मिळणार होते. ‘मी केवळ शीख वा हिंदूंसाठी नव्हे, तर सर्वच अफगाण लोकांसाठी काम करेन’ असे आश्वासन अवतार सिंग देत होते. पण काहींना हे पाहवले नाही. त्यांनी डाव साधलाच.
भारतच नव्हे, कॅनडा वा अन्य देशांत स्थलांतराची संधी असूनही अवतार सिंग यांनी ती नाकारली होती. त्यांचा उल्लेख माजी अफगाण राष्ट्राध्यक्ष हमीद करजाईंसह अनेकांनी ‘देशभक्त अफगाण’ असा केला आहे, तो सार्थच आहे. गुरुद्वारातच कचेरी मांडून, लोकांची गाऱ्हाणी समजून घेऊन प्रशासनाकडे पाठपुरावा करणारे अवतार सिंग आता दिसणार नाहीत. आता अनारकली कौर होनरयार यांच्यासारख्या महिलेवरच अल्पसंख्य नेतृत्वाची जबाबदारी येणार आहे.