संयुक्त राष्ट्रांचा हवामान विज्ञान सल्लागार गट हा खास हवामान बदलांच्या अभ्यासांसाठीच नेमण्यात आला. अलीकडेच त्यांच्या सूचना अमेरिकेने अव्हेरल्या हे खरे; पण या सल्लागार गटाला २००७ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता. या गटाचे सदस्य असलेले जॉन हॉटन हे वेल्सचे हवामान भौतिकशास्त्रज्ञ.  विज्ञान, धोरणनिश्चिती व धार्मिक समुदाय यांच्यात समन्वय घडवून आणण्याचे काम केले. हॉटन यांच्या निधनाने हवामान बदलांच्या समस्यांवर संशोधन करणारा एक ख्यातनाम वैज्ञानिक आपण गमावला आहे. त्यांचा मृत्यू हा करोनाशी संबंधित गुंतागुतीने झाला. संयुक्त राष्ट्रांचा हवामान बदल सल्लागार गट (आयपीसीसी) १९८८ मध्ये स्थापन झाला. या गटाचे तीन पहिले अहवाल हॉटन यांच्या मुख्य संपादकत्वाखाली सादर करण्यात आले होते. १९९० मध्ये या गटाचा पहिला अहवाल प्रसिद्ध  झाला तेव्हाच धोक्याची घंटा वाजवली गेली. त्यानंतर दोन वर्षांनी रिओची वसुंधरा परिषद झाली. त्या वेळी सर्वच देशांनी ही समस्या मान्य केली होती. दुसरा अहवाल १९९५ मध्ये आला. त्यानंतर क्योटो करार झाला.  तिसरा अहवाल २००२ मध्ये सादर केला गेला. त्यात सागरी पातळी वाढण्याचे संकेत देण्यात आले. २००७ मध्ये या सल्लागार गटाला नोबेल मिळाले तेव्हाही हॉटन त्याचे सदस्य होते. हॉटन हे मूळ साउथ वेल्सचे, ब्रिटनच्या हवामान कार्यालयात ते १९८३ ते १९९१ या काळात महासंचालक होते. त्यांनीच ‘हॅडली सेंटर फॉर क्लायमेट सायन्स अँड सव्‍‌र्हिसेस’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. हवामान विज्ञानातील ती एक नावाजलेली संस्था आहे. १९६० पासून त्यांनी हवामान बदलांवर संशोधन सुरू केले. अणुयुद्धानंतरच्या हवामान बदलांचा त्यांनी अभ्यास केला. त्यात नासाच्या निम्बस उपग्रहांचा वापर करण्यात आला होता. वातावरणात कार्बन डायॉक्साइडचे प्रमाण वाढत असल्याबाबत त्यांनी १९८० मध्येच लक्ष वेधले होते. हॉटन यांचा जन्म वेल्समध्ये १९३१ मध्ये झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना ऑक्सफर्डची शिष्यवृत्ती मिळाली. तेथे त्यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास केला. तेथेच ते वातावरणीय भौतिकशास्त्राचे प्राध्यापक झाले. रॉयल सोसायटीचे ते फेलो होते. राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांना उमरावपदाने सन्मानित केले होते. रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक व ‘जपान प्राइझ’ हे सन्मान त्यांना मिळाले. ‘ग्लोबल वॉर्मिग- द कम्प्लीट ब्रीफिंग’ (१९८४) या  त्यांच्या पुस्तकाच्या पाच आवृत्त्या निघाल्या. विज्ञान व धर्म या विषयांवरही त्यांनी लेखन केले. ‘इन द आय ऑफ द स्टॉर्म’ हे आठवणीपर पुस्तक त्यांनी लिहिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा