‘एखादी गोष्ट जमणार नाही, असे ठासून सांगणाऱ्यांचेही ज्यांनी मतपरिवर्तन करून त्यांना सकारात्मक केले’ असे गणितज्ञ म्हणजे मायकेल अतिया. त्यांचे नुकतेच निधन झाल्याने एकविसाव्या शतकातील एक मोठा गणितज्ञ आपण गमावला आहे. न्यूटननंतर भौतिकशास्त्र व गणित यांची सांगड घालण्याचा प्रयत्न कुणी केला नाही तो त्यांनी १९६०च्या सुमारास केला होता, हेच त्यांचे वेगळेपण. काही काळ ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे अध्यक्षही होते. एडिंबर्ग विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मॅथॅमॅटिक्समधून ते निवृत्त झाले. तत्पूर्वी ऑक्सफर्ड व केंब्रिज विद्यापीठातही त्यांनी काम केले.

विसाव्या शतकातील गणितज्ञ इसादोर सिंगर यांच्यासमवेत त्यांनी गणित व भौतिकशास्त्र यांची सांगड घालणारा सिद्धांत मांडला होता.  विश्वाच्या आकलनासाठी त्यांनी सूत्र सिद्धांत व गेज थिअरी यांची मदत घेतली. न्यूटन व लेबनित्झ यांनी त्यांच्या काळात भौतिकशास्त्र व गणित यांची सांगड घातली, तेच काम अतिया व सिंगर यांनी आताच्या काळात केले. अतिया यांनी भारत व पाकिस्तान यांच्यात कधीही आण्विक संघर्ष होऊ नये यासाठी काम करतानाच मध्यपूर्वेतही तणाव कमी करण्यासाठी योगदान दिले होते. ब्रिटनच्या अणुकार्यक्रमावर त्यांनी  जाहीर  टीका करण्याचे धैर्य दाखवले होते. त्यांनी अनेकदा बेंगळूरु येथे भेट दिली, त्या वेळी हरीश चंद्र व विजयकुमार पाटोदी यांच्याबरोबर काम केले. अतिया यांना गणितातील दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. एक म्हणजे फील्ड्स पदक (१९६६) तर दुसरा आबेल  पुरस्कार (२००४). त्यांना १९८३ मध्ये नाइट तर २०११ मध्ये फ्रेंच लिजन ऑफ ऑनर हे सन्मानही लाभले. अतिया यांचा जन्म लंडनचा. वडील स्कॉटिश, तर आई लेबनित्झ. इंग्लिश बोर्डिग स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. नंतर ट्रिनिटी कॉलेजमधून त्यांनी डॉक्टरेट केली. गणिताचा वापर करून जर्मन गणितज्ञ फ्रेडरिक हिरझेब्रुश यांच्यासमवेत त्यांनी स्थानशास्त्रात ‘के-सिद्धांत’ मांडला होता. अतिया-सिंगर इंडेक्स सिद्धांतातून त्यांनी वेगळे काम केले. ‘ही काळी जादू आहे’ असेही ते गमतीने म्हणत असत. नंतर रॉल बॉट व डॉ. विटन या तुलनेने नवख्या गणितज्ञांबरोबर काम करून ते व सिंगर यांनी इंडेक्स सिद्धांताचा वापर करून गणितातील शोधांचा भौतिकशास्त्राशी संबंध उलगडून दाखवला होता. अलीकडेच ऑक्टोबरमध्ये त्यांनी गणितातील रिमान गृहीतकाचा कूट प्रश्न सोडवल्याचे जाहीर करून खळबळ उडवली; पण त्याचे पुरावे त्यांना देता आले नव्हते. नवीन कल्पनांवर विश्वास ठेवणारा एक आशावादी गणितज्ञ आपण त्यांच्या रूपाने गमावला आहे.

Story img Loader