पीडित हा केवळ पीडित असतो. तो कोणत्याही जाती-धर्माचा नसतो. हा एकच ध्यास घेऊन अख्खे आयुष्य जनसामान्यांच्या वेदनेशी जोडून घेणारे उमेश चौबे उपराजधानीतील ‘सजग प्रहरी’ होते. मनात कसलीही लालसा न ठेवता सार्वजनिक जीवनात वावरणे तसे कठीण, पण लढवय्या चौबे यांनी अखेपर्यंत पद, पैशाचा मोह टाळला. मूळचे उत्तर प्रदेशातील, पण स्वातंत्र्यपूर्व काळात नागपुरात येऊन स्थायिक झालेल्या चौबेंनी स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतला, पण स्वातंत्र्यसैनिक म्हणून कधी मिरवले नाही. त्यांचा पिंड पत्रकारितेचा. सामान्य लोकांवरील अन्यायाला वाचा फुटावी म्हणून त्यांनी ‘नया खून’ नावाचे एक साप्ताहिक काढले. अखेपर्यंत ते निष्ठेने चालवले.

चौबे यांची कौटुंबिक पाश्र्वभूमी धार्मिक, पण त्यांना कर्मकांडाचा तिटकारा होता. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सुरू होण्याच्या आधीच त्यांनी येथे भोंदूबाबांच्या विरोधात लढा देण्यासाठी पाखंड पोलखोल समिती स्थापन केली. नंतर अंनिसची स्थापना झाल्यावर ते या संघटनेचे बराच काळ राष्ट्रीय अध्यक्ष होते. काही दशकांपूर्वी मध्य प्रदेशातील झाबुआ या आदिवासीबहुल जिल्ह्यात अंधश्रद्धेतून खुनाचे सत्र देशभर गाजले होते. तेव्हा चौबे प्रबोधनासाठी महिनाभर तेथे तळ ठोकून होते. आरंभापासून त्यांची नाळ लोहियांच्या विचाराशी जुळलेली.

नंतर ते जॉर्ज फर्नाडिसांचे समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले. कट्टर विदर्भवादी अशी ओळख असलेल्या चौबेंचा सर्व स्तरांतील संघटनांत सक्रिय सहभाग असायचा. हमाल पंचायत असो की कष्टकऱ्यांची परिषद. ते त्यात हिरिरीने सहभागी व्हायचे. केवळ नागपूरच नाही तर विदर्भात कुठेही अन्याय, अत्याचाराची घटना घडली की कुठल्याही निमंत्रणाची वाट न बघता चौबे तिथे जातीने हजेरी लावायचे व न्याय मिळेपर्यंत लढा देत राहायचे. त्यांची आंदोलनेही मोठी मजेशीर, पण वर्मावर बोट ठेवणारी असायची. मजुरांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर पिपा पिटो आंदोलन, महिलांच्या छेडखानीच्या विरोधात चाटा मारो आंदोलन, अशी अनेक ‘हटके’ आंदोलने त्यांनी केली.

उपराजधानीला तीनशे वर्षांचा इतिहास आहे, त्यामुळे त्रिशताब्दी साजरी व्हायला हवी हे सर्वप्रथम साऱ्यांच्या लक्षात आणून देणारे चौबेच होते. ते उत्तम नाटककार व कथालेखक होते. हिंदी साहित्याच्या वर्तुळात त्यांचा नेहमी वावर असायचा. नागरी प्रश्नावर आंदोलने करून जनतेला न्याय मिळवून देणारे चौबे काही काळ महापालिकेच्या राजकारणात सक्रिय होते. नगरसेवक, उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या चौबेंचा प्रशासनात कमालीचा दरारा होता. कायम लोकांसाठी झटणारे, अन्यायग्रस्त व पीडितांना प्रसंगी वर्गणी गोळा करून मदत करणारे उमेश चौबे आयुष्यभर कफल्लकच राहिले. अलीकडच्या काळात त्यांचा मधुमेहाचा आजार बळावला होता, पण उपचारांकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले. रुग्णालयात दाखल होण्याच्या आधीपर्यंत प्रत्येक आंदोलनात हिरिरीने सहभाग नोंदवणाऱ्या चौबे यांच्या निधनाने उपराजधानीतील वंचितांचा आधारवडच हिरावला गेला आहे.

Story img Loader