‘थ्री इडियट्स’ या राजकुमार हिराणीकृत चित्रपटातील फुनसुख वांगडूच्या प्रेमात प्रत्येक प्रेक्षक पडला. ही चाकोरीबाहेरची, जगावेगळे प्रयोग करणारी व्यक्तिरेखा साकारली होती आमिर खानने; पण खरोखरच असा माणूस आपल्यात आहे – त्यांचे नाव सोनम वांगचुक. त्यांना नुकताच मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘वास्तवातले फुनसुख वांगडू’ ही तुलना खरे तर वांगचुक नम्रपणे नाकारतात. शिक्षणव्यवस्थेत आंतरबाह्य़ बदलाची एक वेगळी कल्पना सोनम वांगचुक यांनी मनीमानसी बाळगली.
त्यांचा जन्म जम्मू-काश्मीरमधील लेह जिल्ह्य़ातील अलचीमधील एका गावचा. त्यांचे वडील सोनम वांगयाल हे राजकारणी. नंतर राज्य सरकारमध्ये मंत्रीही झाले. सोनम यांच्या खेडेगावात शाळा नसल्याने आईच त्यांची शिक्षक. वयाच्या नवव्या वर्षांपर्यंत ते मातृभाषेतून शिकले. नंतर श्रीनगरला गेल्यानंतर त्यांना भाषेच्या अडचणी जाणवू लागल्या. त्यामुळे शिक्षणही भरकटू लागले हे पाहून ते दिल्लीला आले, तेथे त्यांनी केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेतला. लडाखच्या इतर मुलांवर परकीय भाषा लादली जात असताना भलत्याच भाषेतून शिकण्याच्या शिक्षेतून वांगचुक मुक्त झाले. १९८७ मध्ये त्यांनी श्रीनगरमधील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून मेकॅनिकल इंजिनीयरिंगमध्ये बी. टेक्. पदवी घेतली. नंतर दोन वर्षे फ्रान्समध्ये जाऊन मातीच्या बांधकामांचे धडे क्राटेरे स्कूल ऑफ आर्किटेक्चर या संस्थेतून घेतले. खरा प्रश्न असतो शिक्षण संपल्यानंतरचा. वांगचुक यांनी त्यांचे भाऊ व इतर पाच जणांसमवेत १९८८ मध्ये ‘एज्युकेशनल अॅण्ड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख’ ही संस्था सुरू केली. विद्यापीठातील शिक्षण संपल्यानंतर विद्यार्थी खेडय़ातील मुलांना शिकवायला येऊ लागले.
एरवी ९५ टक्के लडाखी मुले परीक्षांमध्ये नापास होत असत, ती आता उत्तीर्ण होऊ लागली. १९९४ पासून वांगचुक यांनी ‘ऑपरेशन न्यू होप’ हा शैक्षणिक कार्यक्रम राबवला. सौरशक्तीवर चालणाऱ्या शाळा वांगचुक यांनी पर्यावरणस्नेही पद्धतीने तयार केल्या. उणे तीस अंश तापमानात लडाख, नेपाळ व सिक्किममध्ये त्यांनी सुरू केलेल्या शाळा उबदार राहू लागल्या. २००५ मध्ये वांगचुक यांची मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण मंडळावर निवड केली. वांगचुक यांनी ‘आइस स्तुपा’ नावाची कृत्रिम हिमनदीही तयार केली आहे. त्यात हिवाळ्यात पाण्याचे प्रवाह बर्फाच्या स्वरूपात गोठतात व उन्हाळ्यात वितळतात, त्यातून शेतीला पाणी मिळते. लडाखमध्ये त्यांनी २०१६ मध्ये ‘फार्मस्टे लडाख’ हा कार्यक्रम सुरू केला. त्यात पर्यटक लडाखमधील स्थानिक कुटुंबांबरोबर जीवन शिक्षण घेत राहतात. त्यांना २०१६ मध्ये सामाजिक उद्योजकतेसाठी प्रतिष्ठेचा ‘रोलेक्स पुरस्कार’ मिळाला होता.