कथाकार सखा कलाल यांच्या निधनाची वार्ता शुक्रवारी आली, तेव्हा अनेकांना ‘कोण हे कलाल?’ असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याचे कारण कलाल यांनी कथा लिहिल्या, त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले, एके काळी अनेकांना आपल्या लेखनावर ज्यांची मुद्रा उमटावी असे वाटे त्या ‘मौज’ने ते प्रसिद्ध केले होते, वगैरे सारे ऐंशीच्या दशकाआधीचे. त्यानंतर कलाल यांचे कथालेखन जवळपास थांबलेच; फुटकळ स्फुटलेखन केले तेही मुख्य प्रवाहात आले नाही. बरे, तुटपुंज्या लेखकीय भांडवलावर व्याख्याने, संमेलने, चर्चासत्रे यांचा धुरळा उडवणे हेही कलाल यांना जमले नाही. तो त्यांचा स्वभाव नव्हता. ते पडले मितभाषी. ते ज्या कोल्हापूरमध्ये वावरले, तेही साहित्याचे तसे मुख्य केंद्र नव्हे. हे सारे तपशील पाहता, कलाल यांचे स्मरण राहणे तसे अवघडच. पण तरीही सखा कलालांना लक्षात ठेवले पाहिजे, याचीही कारणे आहेत. त्यातील एक म्हणजे ग्रामीण जीवनसंस्कृतीचा जिवंत प्रत्यय देणाऱ्या त्यांच्या कथा आणि दुसरे म्हणजे या कथांतून ग्रामीण समाजजीवनापेक्षा ग्रामीण व्यक्तीच्या जीवनातील उमटलेले तीव्र व हळवे स्वर. आणि मुख्य म्हणजे, ग्रामीण महाराष्ट्रीय जीवनाच्या वाटचालीच्या सातत्यातील एक तुकडा कलाल यांनी मराठी वाचकांना दाखवला म्हणून!
स्वातंत्र्यपूर्व काळात र. वा. दिघे, ग. ल. ठोकळ, श्री. म. माटे, वामन चोरघडे यांनी ग्रामीण विश्व कथेत आणले. मात्र त्या कथा रंजकताप्रधानच अधिक होत्या. या रंजकतेला फाटा देत ग्रामीण जीवनाचा तळ धुंडाळणारी कथा व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, अण्णा भाऊ साठे, महादेव मोरे आदींनी लिहिण्यास सुरुवात केली, ती स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकभरात. याच काळात सखा कलाल हेही कथा लिहू लागले. १९५९ साली ‘हिरवी काच’ ही त्यांची कथा ‘सत्यकथा’त प्रसिद्ध झाली; या कथेतील अभावग्रस्तेतील श्यामचा निरागसपणा त्यांनी कलात्मकतेने टिपला आहे. काहींचे म्हणणे आहे की, बेळगावच्या रायबागमध्ये जन्मलेल्या (१९३८), तिथल्या माळरानावर बालपण घालवलेल्या सखा कलाल यांचे जगणेच त्यात आले आहे. या कथेनंतर ‘सत्यकथा’च्या विशुद्ध वाङ्मयीन वर्तुळात त्यांचा शिरकाव झाला आणि पुढील वर्षभरात ‘विहीर’, ‘रान’, ‘फेड’ या त्यांच्या कथा ‘सत्यकथा’तच प्रसिद्ध झाल्या. ग्रामीण माणसाचे जगणे, त्यांच्या व्यथा-वेदना, मानसिक हिंदूोळे कलाल यांनी आपल्या कथांमधून मांडावयास सुरुवात केली.
एकीकडे हे सुरू असताना, सुंदर हस्ताक्षराचे देणे लाभलेले कलाल याच काळात काही काळ लेखनिक, लिपिक म्हणून उमेदवारी करत होते. परंतु पुढे ग्रंथालयशास्त्रातील शिक्षण घेत लवकरच ते कोल्हापूरच्याच महाविद्यालयात ग्रंथपालपदी रुजू झाले आणि ही करवीरनगरीच त्यांची कर्मभूमी झाली. १९७४ साली ‘ढग’ आणि पुढे काही वर्षांनी ‘सांज’ हे त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले. या संग्रहांनंतर कलालांनी कथालेखन जणू थांबवलेच. ‘पार्टी’ या शीर्षकाचा त्यांचा स्फुट लेखसंग्रह त्यानंतर आला खरा, पण कथालेखक कलाल यांची झाक त्यात नव्हती.