‘मला त्या वेळी ऑनलाइन धमक्या येत होत्या. जर मी त्याची चिंता केली असती तर काहीच काम करू शकले नसते’, असे सांगणाऱ्या मुक्त पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी शोधपत्रकारिता करताना अनेकांचा रोष ओढवून घेतला आहे, पण म्हणूनच त्या वृत्तपत्रस्वातंत्र्याच्या खऱ्या रक्षणकर्त्यां आहेत. त्यांचा अलीकडेच लंडन वृत्तपत्रस्वातंत्र्य पुरस्काराने गौरव करण्यात आला. भाजपच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ऑनलाइन माध्यमातून कसा शिवराळ भाषेत प्रचार केला, अनेकांना धमक्या दिल्या याचा भांडाफोड त्यांनी केला. त्यांनी लिहिलेले ‘आय अॅम ट्रोल- इनसाइड सिक्रेट वर्ल्ड ऑफ दी बीजेपी डिजिटल आर्मी’ हे पुस्तक विशेष गाजले, त्यानंतर त्यांनी डॅडीज गर्ल या कादंबरीत आरुषी तलवार प्रकरणाची आठवण करून देताना माध्यमांवरही सडकून टीका केली आहे.
अनेक देशांतील सरकारांची परिस्थिती सध्या एकही विरोधी शब्द सोसवत नाही अशी असहिष्णू आहे, पण म्हणून पत्रकारांनी त्यांच्या लेखण्या म्यान केलेल्या नाहीत ही सकारात्मक बाब आहे असे त्या सांगतात. स्वाती चतुर्वेदी या शोधपत्रकार म्हणून परिचित आहेत. शोधपत्रकारितेसाठी प्रसंगी जिवावर उदार होण्याचे धाडस, माहिती खोदून काढण्याचे तंत्र अवगत असावे लागते हे सगळे गुण त्यांच्यात आहेत. वीस वर्षे शोधपत्रकारितेत काम करताना त्यांनी राजकीय वर्तुळ हादरवून सोडणाऱ्या अनेक बातम्या दिल्या. ज्या भारतातच नव्हे तर जगात नावाजल्या गेल्या. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’, ‘हिंदुस्तान टाइम्स’ व ‘दी स्टेट्समन’ या वृत्तपत्रात त्यांनी सुरुवातीला काम केले. नंतर त्या ‘झी न्यूज’मध्ये सहायक संपादक होत्या. ‘कहिये जनाब’ हा कार्यक्रम त्या सादर करीत असत. नंतर त्यांनी अभ्यास रजा घेऊन पेंग्विनसाठी दोन कादंबऱ्या लिहिल्या, त्यातील एक म्हणजे ‘डॅडीज गर्ल’. इंटरनेटमुळे समाजमाध्यमांचा सुळसुळाट झाला त्याचा फायदा उठवणारा पहिला पक्ष म्हणजे भाजप. त्यांनी १९९५ मध्येच पक्षाचे संकेतस्थळ सुरू केले. पंतप्रधान मोदींचे व्यक्तिगत संकेतस्थळ २००५ मध्ये सुरू झाले तर त्यांचे ट्विटर खाते २००९ मध्ये सुरू झाले. तुलनेने काँग्रेस त्यात मागे पडली. त्यांचे संकेतस्थळ २००५ मध्ये सुरू झाले तर राहुल गांधी यांचे ट्विटर खाते २०१५ मध्ये सुरू झाले. भाजपच्या जल्पक सैन्याने त्या वेळी जे ट्रोलिंग केले ते शिवराळ भाषेत होते, त्याचा भांडाफोड केल्याने चतुर्वेदी यांना या टोळक्यांनी ठार मारण्याच्या वा बलात्काराच्या धमक्याही देण्यात आल्या. कालांतराने त्या साहित्य लेखनाकडे वळल्या असून त्याही मार्गाने त्या राजकारणीच नव्हे तर माध्यमांचेही पितळ उघडे पाडीत आहेत.