शास्त्रीय संगीतातील अनेक मान्यवरांना तबल्याची संगीतसाथ करणारे ज्येष्ठ तबलावादक पं. अरविंद मुळगावकर यांच्यासाठी तबला हाच श्वास आणि ध्यास होता. आपले संपूर्ण जीवन तालसाधनेत व्यतीत करणाऱ्या पं. मुळगावकर यांनी आपल्याजवळील सर्व ज्ञानसंचित हात आखडता न घेता पुढील पिढी आणि कलारसिकांसाठी सढळहस्ते वाटून टाकले. धर्म, जात, भाषा, पंथ आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संगीतातील घराण्यांमध्येही त्यांनी कधीही आणि कोणताही भेदभाव केला नाही.
पं. मुळगावकर यांनी लिहिलेले ‘तबला’ तसेच त्यांचे गुरू तबलानवाझ उस्ताद आमिर हुसेन खाँ यांच्यावर लिहिलेले ‘आठवणींचा डोह’ हे दोन ग्रंथ म्हणजे तबल्याचे समग्र कोशच म्हणता येतील. ‘तबला’ या ग्रंथात तबला या तालवाद्याचा इतिहास तर आहेच, पण तबलावादकांच्या संगीत घराण्यातील सर्व तबलावादकांची छोटी चरित्रे यात आहेत. त्यामुळे तबला, तबलावादक यांच्याविषयीची समग्र माहिती आणि इतिहास एकत्रित उपलब्ध झाला आहे. ‘आठवणींचा डोह’ या ग्रंथात आमिर हुसेन खाँ यांच्यासह अन्य मान्यवरांच्या बंदिशी/रचना त्यांनी ग्रंथबद्ध केल्या आहेत. या बंदिशींचे सौंदर्य उलगडून दाखविण्याबरोबरच पं. मुळगावकर यांनी या बंदिशींमधील विराम आणि प्रत्यक्ष कृती यांचा संगम कसा साधला गेला तेही सोदाहरण स्पष्ट केले आहे. तबला शिकणारे विद्यार्थी, अभ्यासक, गायक, रसिकांसाठीही या ग्रंथांद्वारे त्यांनी केलेले काम महत्त्वाचे आहे. तबलाविषयक अनेक व्याख्यानांमधूनही त्यांनी तबला तालवाद्य, बंदिशी प्रात्यक्षिकांसह सोप्या भाषेत उलगडून दाखविल्या होत्याच. बंदिश तबला आर्ट फाऊंडेशन या संस्थेतर्फे ते दर वर्षी आपले गुरू आमिर हुसेन खाँ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संगीत कार्यक्रमांचे आयोजन करीत होते. वेगवेगळ्या संगीत घराण्यांतील प्रथितयश आणि उदयोन्मुख अशा दोन्ही तबलावादकांचे एकल तबलावादन ते कार्यक्रमातून रसिकांपुढे सादर करीत. त्यांच्या संगीत घराण्याबाहेरील तबलावादकांचेही त्यांना कौतुक होते. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा अनेक होतकरूंना त्यांनी कोणतेही शुल्क न घेता तबला आणि अन्य तालवाद्यांचे विनामूल्य मार्गदर्शन केले. काहीही हातचे न राखता विद्यार्थी आणि शिष्यांना त्यांनी तबल्याचे धडे दिले.
पं. मुळगावकर हे आधुनिक विचारसरणीचे आणि उदारमतवादी होते. हलाखीचे जीवन जगणाऱ्या कलावंतांनाही (धर्म/जात न पाहता) त्यांनी मदतीचा हात नेहमीच पुढे केला होता. तबला या तालवाद्याचे आणि तबला संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.