राजनैतिक अधिकारी म्हणून काम करतानाच साक्षेपी इतिहासकार ही डॉ. टीसीए राघवन यांची दुहेरी ओळख. इंडियन कौन्सिल फॉर फॉरेन अफेअर्स म्हणजे आयसीडब्ल्यूएच्या महासंचालकपदी त्यांची अलीकडेच करण्यात आलेली नियुक्ती त्यांच्यातील या चतुरस्रतेमुळे सयुक्तिकच आहे. राघवन यांनी दक्षिण आशियातील देशांत राजनैतिक अधिकारी म्हणून काम करताना प्रत्यक्ष घेतलेला अनुभव, पाकिस्तानातील नियुक्तीत त्यांनी बजावलेली कामगिरी यांसह परराष्ट्र खात्यात काम करतानाच्या कारकीर्दीवर आधारित केलेले लेखन या त्यांच्या जमेच्या बाजू.
इस्लामाबाद व सिंगापूर येथे त्यांनी भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केले. ‘अटेंडंट लॉर्ड्स’, ‘बैराम खान अॅण्ड अब्दुर रहमान पोएट अॅण्ड कोर्टियर इन मुघल इंडिया’ ही त्यांची प्रमुख पुस्तके. त्यात अलीकडेच ‘दी पीपल नेक्स्ट डोअर – दी क्युरियस हिस्टरी ऑफ इंडियाज रिलेशन्स विथ पाकिस्तान’ हे पुस्तक विशेष गाजते आहे. त्यात भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधांचा इतिहास राजनैतिक अधिकारी या नात्याने त्यांनी मांडला आहे. दोन्ही देशांतील संबंधांचे अधिक जिवंत चित्रण, काही किस्से, सामान्य लोकांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी याची जोड असल्याने त्यात कृत्रिमता नाही. भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधांचा विचार करताना बहुतेकांनी पूर्वग्रह ठेवूनच मांडणी केली, तसे राघवन यांनी केलेले नाही हे त्यांचे वेगळे वैशिष्टय़. राघवन हे दिल्ली विद्यापीठाचे पदवीधर. नंतर इतिहासातच पदव्युत्तर पदवी घेऊन जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आधुनिक भारतीय इतिहासात त्यांनी विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी घेतली. १९८२ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण विभागाचे सहसचिव म्हणून काम केले. त्यात त्यांनी दक्षिण आशिया धोरणाच्या आखणीत अनेक मुद्दय़ांवर सखोल विचार केला. राघवन यांचे नाव पाकिस्तान अभ्यासविषयक तज्ज्ञ म्हणून अग्रक्रमाने घेतले जाते. ब्रिटन, भूतान व कुवेत या देशांमध्येही त्यांनी काम केले. २०१२ मध्ये दिल्लीत सामूहिक बलात्काराच्या घटनेतील मुलीला सिंगापूरला उपचारांसाठी हलवण्यात आले होते, त्या वेळी राघवन सिंगापूरमध्ये उच्चायुक्त होते. त्या कसोटीच्या प्रसंगात आंतरराष्ट्रीय माध्यमांना त्यांनी खुबीने हाताळले. भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त म्हणून ३१ डिसेंबर २०१५ रोजी ते निवृत्त झाले. राघवन हे पारंपरिक ‘बाबू’ पठडीतील अधिकारी नक्कीच नाहीत. त्यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांकडे इतिहासाचे कुठलेही ओझे न बाळगता ते अतिशय निकोप दृष्टिकोनातून बघू शकतील यात शंका नाही.