सनदी अधिकाऱ्यांबद्दल, राजनैतिक अधिकाऱ्यांबद्दल सामान्यांचे काही अपेक्षावजा समज असतात. ‘आयएएस’ या सेवेतील माणसाने प्रधान सचिवपदी जाणे, ही कारकीर्दीची परमावधी समजली जाते किंवा ‘इंडियन फॉरेन सव्र्हिस’- आयएफएस- मधील व्यक्तीने अमेरिकेत किंवा संयुक्त राष्ट्रांत काम करणे, हे कारकीर्दीची शान मानले जाते. प्रत्यक्षात या साऱ्या सनदी सेवा स्वत:च्या कारकीर्दीसाठी नसून देशसेवेसाठी असतात. त्यामुळेच ‘आयएएस’मधले एखादे महापालिका आयुक्तही लक्षात राहील असा बदल घडवून लोकांचा दुवा घेतात, आठवणीत राहतात. ऐन नेहरूकाळात, देश स्वतंत्र्य झाला त्यास उणीपुरी तीन-चार वर्षेच झाली असताना ‘आयएफएस’मध्ये जाऊन राजनैतिक अधिकारी झालेले थॉमस अब्राहम हे श्रीलंकेतील कामासाठी- भारत आणि भारतीय वंशाच्या लोकांचे जे हितरक्षण त्यांनी केले त्यासाठी- नेहमी स्मरणात राहतील. राजदूत (श्रीलंका हा राष्ट्रकुल देश, म्हणून तेथील भारतीय ‘उच्चायुक्त’) पदावरून निवृत्त झालेल्या थॉमस अब्राहम यांचे रविवारी, वयाच्या ९१ व्या वर्षी केरळमधील कडापरा या त्यांच्या मूळ गावी निधन झाले.
‘जगण्यासाठी, पोटासाठी भारतातून १०० वर्षांपूर्वी श्रीलंकेत आलेल्या तमिळींना एवढय़ा-तेवढय़ा कारणावरून बेकायदा रहिवासी ठरवले जाते. हे प्रकार नेहरू असताना घडत नव्हते. शास्त्रीजींनी १९६४ साली सिरिमाओ भंडारनायकेंशी केलेल्या परतपाठवणी कराराचा गैरफायदा श्रीलंका घेते आहे. असे होऊ नये, तमिळींना श्रीलंकेतच- त्यांच्या कर्मभूमीत- राहता यावे, यासाठी या कराराचा गाभा समजून घेण्याची गरज आहे’ असे म्हणणे अब्राहम यांनी १९७८ ते ८२ या काळात प्रथम मोरारजी आणि नंतर इंदिरा गांधींपुढे मांडले, तमिळींची परतपाठवणी ‘नैसर्गिक’ होत नसून त्यामागे वांशिक दुस्वास हेही कारण असू शकते हेही ओळखले आणि १९६४च्या कराराचा योग्य अर्थ तत्कालीन श्रीलंकन सत्ताधाऱ्यांना मान्य करावयास लावला. पुढे तमिळ-प्रश्न पेटला, ही निराळी गोष्ट. पण हिंसाचाराआधीच तमिळींना ‘बाहेरचे’ आणि ‘घुसखोर’ ठरवून, सुरक्षेची मोघम कारणे देऊन जो अन्याय होत होता, त्याचे निराकरण अब्राहम यांच्या कार्यनिष्ठेमुळे झाले.
बर्न (स्वित्र्झलड) येथे तसेच पूर्व युरोपातही काही काळ काम केलेल्या अब्राहम यांना, दक्षिण आणि आग्नेय आशियातच खरा रस होता. त्या देशांच्या इतिहासात त्यांना, त्यांच्या इतिहासकार पत्नी मीरा यांच्याप्रमाणेच, रस होता. भेटलेल्या व्यक्तींवर त्यांची सहज छाप पडे, म्हणूनच सिंगापूरचे ली क्वान यू किंवा पी. एन. हक्सर यांच्या आत्मचरित्रांतही थॉमस अब्राहम यांचे उल्लेख आढळतात.