भारतीय अभिजात संगीताला हार्मोनिअमसारख्या पाश्चात्त्य वाद्यावर सादर करण्याला एकेकाळी विरोध करणाऱ्या संगीतक्षेत्रातील दिग्गजांना पंडित तुळशीदास बोरकर यांनी आपल्या समर्थ वादनाने चोख उत्तर दिले. ब्रिटिशांनी आणलेल्या या वायुवाद्यावर १९व्या शतकाच्या अखेरीपासून मराठी संगीत रंगभूमीने आपले संगीत आणविले होते. हार्मोनिअमशी बंधुत्व असलेला ऑर्गन म्हणजेच पायपेटी संगीत नाटकाचा अविभाज्य घटक बनली, तरीही नभोवाणीवर हार्मोनिअमला मान्यता नव्हती. अशाही काळात तुळशीदास बोरकर आपल्या वादनाने सगळ्यांना मोहित करत होते. संगीत नाटकांमध्ये त्यांचे ऑर्गनवादन उठून दिसे, ते कलावंताचा केवळ बरहुकूम पाठलाग करत होते म्हणून नव्हे. त्या वादनामध्ये कलावंताला खुणावणाऱ्या अनेक सर्जक शक्यता असत. गायकाला त्याची प्रतिभा जे खुणावत असते, त्याचे ते दिशादर्शन असे. भारतातल्या श्रेष्ठ कलावंतांना बोरकरांची प्रतिभेची संगत भावत असे. पण स्वतंत्र वादनातही त्यांची सर्जनशीलता अशी काही रंगत आणत असे, की श्रोत्यांना हर्ष झाल्याशिवाय राहत नसे. गोव्याच्या स्वरांगणात लहानपणापासूनच झालेल्या स्वर-संस्कारांना जिद्दीने, कष्टाने पुढे नेत, त्यांनी या क्षेत्रात स्वत:ची नाममुद्रा उमटवली. संगत करताना गायक कलाकाराला सुखद वाटेल, अशा रीतीनेच त्याचे गाणे खुलण्यासाठी मदत करायची असते, हा त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेला संदेश असे. संशोधन करून हार्मोनिअम या वाद्याला भारतीय संगीताला अनुकूल करण्याचे त्यांचे प्रयत्न फारच महत्त्वाचे आहेत. संगीताचार्य गंगाधरपंत आचरेकर यांनी तयार केलेल्या श्रुतीपेटीचे संशोधन पुढे नेण्यात त्यांनी खूपच मोलाचे योगदान दिले. एका अर्थाने हे पाश्चात्त्य बनावटीचे वाद्य भारतीय संगीताच्या दरबारात नव्या क्षमतांनी सिद्ध करण्याचा हा प्रयोग सुरू असताना, आपले वादन नेहमीच काटेकोर कसे राहील, याची दक्षता ते घेत राहिले. त्यांनी शिष्यांवर केलेले संस्कार संगीताच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहेत. एकल वादन, साथसंगत, संशोधन व अध्यापन अशा सर्वच क्षेत्रांत तुळशीदासजींनी आपले वेगळेपण सिद्ध केले. त्यामुळे गोविंदराव टेंबे आणि बालगंधर्व यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसारखे अनेक पुरस्कार त्यांच्या वाटय़ाला येणे अगदीच स्वाभाविक होते. संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि पद्मश्री ही त्यांच्या कलासाधनेला मिळालेली दादच. मितभाषी पण अतिशय गोड स्वभावाचे कलावंत म्हणून त्यांची ओळख कलाक्षेत्रात कायम राहील. त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे त्यांनी घडवलेली शिष्यपरंपरा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जात राहील. अभिजात संगीत टिकवून ठेवतानाच, त्याला पुढे जाण्याचे बळ देणाऱ्या पं. बोरकरांसारख्या कलावंताचे निधन ही म्हणूनच क्लेशदायक घटना ठरते.
तुळशीदास बोरकर
नभोवाणीवर हार्मोनिअमला मान्यता नव्हती.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 01-10-2018 at 02:05 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tulsidas borkar