मुंबई ते शांघाय हा प्रवास मोटरसायकलवरून २०१० साली एकटय़ाने करणारा आणि हा प्रवास ‘भारतातलं सरदार सरोवर (नर्मदा) आणि चीनमधलं थ्री गॉर्जेस या दोन्ही धरणांमुळे झालेल्या विस्थापनाकडे लक्ष वेधण्यासाठी आहे’ असेही आधीच जाहीर करून त्या प्रवासादरम्यानच्या मानवी अनुभवांवर रोजच्या रोज ब्लॉग लिहिणारा तुषार जोग वयाच्या अवघ्या ५२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने गेला, या बातमीने नर्मदा आंदोलनातील सहभागींना हळहळ वाटली. खरे तर मोटरसायकल-प्रेमींनाही हळहळ वाटायला हवी; पण ‘दृश्यकलावंत’ हा शिक्का तुषारवर बसल्यामुळे कदाचित ती वाटणार नाही. तुषारने शिल्पकलेचे रीतसर शिक्षण ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मधून तसेच बडोद्याच्या सयाजीराव विद्यापीठातून घेतले होते आणि कलादालनांतसुद्धा त्याच्या कलाकृतींना चाहते होतेच, पण चिरतरुण दिसणारा, उत्साहाचा आणि सकारात्मकतेचा झराच भासणारा तुषार हा मूळचा साहसप्रेमी कार्यकर्ता! त्यामुळेच कदाचित, पन्नाशीत आला तरी त्याला कुणीही – त्याच्या विद्यार्थ्यांनीदेखील- ‘अहोजाहो’ केले नाही. सर्वासाठी ‘तो’ तुषारच राहिला. लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी दृश्यकलेचा वापर करत राहिला. हे करताना, आपली कलाकृती लोकांना भिडायला हवी, म्हणून आजच्या तरुणांच्या परिचयाची- कॉमिक्समधले सुपरहिरो आणि ‘व्हिडीओ गेम’ची दृश्यभाषा तो वापरत राहिला. दोन वर्षांपूर्वीच्या ‘पुणे बिएनाले’त झेड ब्रिजवर त्यानं ‘कर्मा क्रायसिस’ नावाचा गेमच कलाकृती म्हणून प्रदर्शित केला होता. पुण्याच्या वाहतूक समस्येकडेच नव्हे, तर लोकांच्या बेदरकारपणाकडेही हा ‘गेम’ खेळताना प्रेक्षकांचे लक्ष वेधले जाई. लोकसहभागाला प्रोत्साहन देणाऱ्या कलाकृती करणे, हे त्याचे खास वैशिष्टय़ होते. मात्र, कलादालनांतही त्याचा दबदबा इतका की, ‘स्कोडा आर्ट प्राइझ’ हा उच्चभ्रू पसंतीच्या दृश्यकलावंतांना मिळणारा पुरस्कार २०१३ साली पटकावू शकणाऱ्या पाच जणांची जी उपांत्य यादी जाहीर झाली, त्यातही त्याचा समावेश आयोजकांनी केला होता. पुरस्काराने हुलकावणी दिली, पण सामाजिक जाणिवेशी तडजोड न करतासुद्धा कलेत नाव कमावता येते हे तुषारने दाखवून दिले. एकदा नव्हे, अनेकदा. याचे कारण त्याची कल्पकता, त्याच्या कलाकृतींमधला नवेपणा आणि त्यामागची निराळी- सहेतुक- सौंदर्यदृष्टी. अनेकांची सामाजिक जाणीव कलानिर्मितीपुरतीच राहाते, तसाही तुषार नव्हता. कलावंतांना सामाजिक कारणांसाठी एकत्र आणण्याचे अनेक संघटनप्रयोग त्याने केले. विद्यार्थ्यांमध्ये, तरुणांमध्ये नेहमीच आत्मविश्वास जागवणारा तुषार कलाशिक्षणाच्या क्षेत्रातही आपली मोहोर उमटवून गेला. दिल्लीच्या शिव नाडर युनिर्व्हसिटी या खासगी विद्यापीठातील कलाविभागाचा अभ्यासक्रम आखणाऱ्यांत तुषारचा सहभाग होता. त्यामुळेच, त्याच्या अकाली जाण्याने केवळ कलाक्षेत्राची नव्हे तर समाजाचीही हानी झाली आहे.
तुषार जोग
दोन वर्षांपूर्वीच्या ‘पुणे बिएनाले’त झेड ब्रिजवर त्यानं ‘कर्मा क्रायसिस’ नावाचा गेमच कलाकृती म्हणून प्रदर्शित केला होता.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 19-12-2018 at 01:33 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tushar jog profile