समाजमाध्यम व्यासपीठ कंपन्यांचे वापरकर्ते जितके जास्त तितका डेटा अधिक आणि जितका डेटा अधिक तितक्या जाहिराती अधिक. ट्विटरचे अर्थकारणही याच सूत्रावर अवलंबून होते. करोडो वापरकर्त्यांकडून येणाऱ्या माहितीचे विघटन-विश्लेषण करणाऱ्या गणितीय रचना आणि अल्गोरिदम यांचा वापर करून वापरकर्ता-लक्ष्यी (युजर टार्गेटेड) जाहिराती प्रसारित करण्याचे तंत्र ट्विटरने वापरले. साहजिकच जाहिरातींचा ओघ ट्विटरचे उत्पन्न वाढले. हे तंत्र विकसित करणाऱ्या अभियंत्यांपैकी एक असलेल्या पराग अग्रवाल यांची आता ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदी निवड झाली आहे. या पदावरून पायउतार होणाऱ्या जॅक डॉर्सी यांनी सोमवारी पराग यांच्या नावाची घोषणा केली तेव्हा अनेकांना धक्का बसला. पण ज्यांना पराग अग्रवाल हे नाव ठाऊक आहे, त्यांना ही निवड सार्थ वाटते. कारण ट्विटरच्या दशकभराच्या वाटचालीत झालेल्या आमूलाग्र बदलांमागील सूत्रधारांत पराग यांचा समावेश होता. मशिन लर्निगवर आधारित जाहिरातींचा ओघ वाढवणे असो, ट्विटरच्या पायाभूत व्यवस्थेचा कायापालट करणे असो की अलीकडेच ट्विटरने आखलेले वापरकर्ता विकेंद्रीकरणाचे धोरण असो, ३७ वर्षीय पराग अग्रवाल यांचे त्यात मोलाचे योगदान आहे. पराग हे जॅक डॉर्सी यांचीच सावली असल्याचेही म्हटले जाते. नम्रपणा आणि स्वभावातील शांतपणाबरोबरच इंटरनेटवरील निस्सीम प्रेम आणि तंत्रज्ञानाची सखोल जाणीव हे या दोघांतील समान धागे आहेत. पराग अस्सल मुंबईकर. अणुऊर्जा शिक्षण संस्थेच्या शाळेत ते शिकले. आयआयटी मुंबईतून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर २००५ मध्ये पीएचडीसाठी त्यांनी अमेरिकेतील स्टॅन्फोर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. संगणकांत संग्रहित होणारी अवाढव्य डिजिटल माहिती हा नेहमीच त्यांच्या संशोधन आणि कुतुहलाचा विषय राहिला आहे. गणितातील त्यांच्या गतीची त्याचे स्टॅन्फोर्डमधील शिक्षक, संशोधक सहकारीही प्रशंसा करतात. मायक्रोसॉफ्ट रिसर्च आणि याहू रिसर्च या कंपन्यांमध्ये सुरुवातीची काही वर्षे काम केल्यानंतर पराग ट्विटरमध्ये रुजू झाले. त्यानंतर अवघ्या सहा वर्षांतच, २०१७ मध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) म्हणून त्याची नेमणूक झाली. ट्विटरच्या लोकप्रियतेचे आणि उत्पन्नाचे गुणोत्तर समान करणाऱ्यांत पराग यांचा मोठा वाटा आहे. आता मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर विराजमान झाल्यानंतर त्यांना हे कौशल्य पणाला लावावे लागेलच, पण त्यासोबतच ट्विटरच्या धोरणांवरून भारतासह काही देशांच्या राज्यकर्त्यांशी आणि यंत्रणांशी उडत असलेले खटके हे मोठे आव्हानही त्यांच्यासमोर असेल.
पराग अग्रवाल
ट्विटरच्या लोकप्रियतेचे आणि उत्पन्नाचे गुणोत्तर समान करणाऱ्यांत पराग यांचा मोठा वाटा आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 01-12-2021 at 01:33 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter ceo parag agarwal profile zws