गावगाडा दुभंगल्यावर हाती पोट घेऊन शहरांकडे वळलेल्यांचे असहायपण सध्याच्या करोनाकालीन टाळेबंदीने दाखवून दिले असले, तरी अशा अभागी जीवांच्या हुंकारांचे प्रतिध्वनी दलित साहित्य गेली ७० वर्षे ऐकवत आहे. जगण्याची अगतिक धडपड करणाऱ्या अशा अनेकांच्या करुण कहाण्या सांगणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांची निधनवार्ता ऐन टाळेबंदीतच रविवारी आली अन् अनेकांना चटकन आठवले ते त्यांचे आत्मकथन.. ‘काटय़ावरची पोटं’! साताऱ्याच्या खटावमधील येणकुळ हे त्यांचे मूळ गाव. मातंग समाजातील तुपे कुटुंबीय जगण्याची परवड होऊ नये म्हणून मजल-दरमजल करीत नगरच्या श्रीगोंद्यात येऊन वसले. तिथेच १९४८ साली उत्तम तुपे यांचा जन्म झाला. सात भावंडे आणि आई-वडिल असा मोठा खटाला असलेले हे कुटुंब केकताडीच्या काटेरी पानांपासून तयार केलेला मऊसूत वाख (दोरखंड) विकून उदरनिर्वाह करीत असे. विहिरीवरच्या मोटेसाठी हे दोरखंड वापरले जात. पण ते तयार करायचे म्हणजे, केकताडीच्या बेटातून काटेरी पाने बाजूला काढणे, त्यावरील काटे साळणे, मग त्या पानांच्या पेंढय़ा गावच्या ओढय़ात सडवून शेवटी त्यातून पांढरा लुसलुशीत दोरखंड तयार करणे अशी जिकिरीची प्रक्रिया. हातातोंडाची गाठ पडण्यासाठी घरातल्या साऱ्यांनाच ते करावे लागे. चौथीतच शिक्षण सोडून द्यावे लागलेल्या उत्तम तुपेंच्या हाती लेखणीऐवजी केकताड कापण्याची कत्तीच आधी आली. असे हे काटय़ांवर तरलेले जग ‘काळीज फाडून पार इस्कटून दाखवावं’ म्हणून तुपेंनी ‘काटय़ावरची पोटं’ हे आत्मकथन लिहिलं. त्याच्या दीड दशक आधी गावी दुष्काळ पडल्याने जगण्यासाठी पुण्यात आलेले तुपे लहान-मोठी मजुरीची कामे करत राहिले. तिथेच कधी तरी अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याची ओळख झाली अन् तुपेंमध्ये लेखनाची ऊर्मी जागली. १९७२ साली पुण्यातल्या ‘विज्ञापना’ मासिकात ‘हुंडा’ नावाची त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. तिथून पुढील तीनेक दशके ते अखंड लिहितेच राहिले. ‘आंदण’, ‘कोंबारा’, ‘माती आणि माणसं’, ‘पिंड’ असे उपेक्षितांचे जगणे मांडणारे कथासंग्रह असोत वा जगन जोगतिणीच्या बंडखोरीची कहाणी सांगणारी ‘झुलवा’ ही कादंबरी असो किंवा गावगाडा व दलितत्वाच्या ओझ्याखाली गुदमरलेल्यांचे जगणे चित्रित करणाऱ्या ‘इजाळं’, ‘भस्म’, ‘शेवती’, ‘खुळी’ यांसारख्या कादंबऱ्या असोत; तुपे यांनी आपल्या तीक्ष्ण निरीक्षणांतून आणि वास्तववादी कथनशैलीतून केलेले हे लेखन मराठी साहित्यात अनवट ठरले. यांत्रिकीकरण, त्यातून बलुतेदारीवर आलेली टाच, ग्रामीण-कृषीजीवन या साऱ्याचे पडसाद त्यांच्या साहित्यात उमटले. जात व मानवी संबंध यांच्या परिघात संयतपणे लिहित्या राहिलेल्या तुपे यांनी कुठल्या विचार-चळवळीशी उघडपणे बांधिलकी मानली नाही. पुण्यात कुठल्याशा सरकारी कार्यालयात चपराशीची नोकरी करत खडकीच्या झोपडपट्टीत ते राहिले अन् काटय़ावरचे पोट घेऊन रविवारी निरोप घेते झाले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Apr 2020 रोजी प्रकाशित
उत्तम बंडू तुपे
पुण्यात कुठल्याशा सरकारी कार्यालयात चपराशीची नोकरी करत खडकीच्या झोपडपट्टीत ते राहिले अन् काटय़ावरचे पोट घेऊन रविवारी निरोप घेते झाले.
Written by लोकसत्ता टीम
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 28-04-2020 at 00:02 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttam bandu tupe profile abn