सुमारे ७५ वर्षांपूर्वी ‘सय्यद गायन पार्टी’चे कार्यक्रम गणेशोत्सवात सादर करणारे सय्यद महबूब शहा कादरी ऊर्फ सय्यदभाई हे पैशांअभावी शिक्षण सोडून नोकरीच्या मार्गाला लागले. पण त्यांचे आयुष्य केवळ नोकरीपुरते मर्यादित राहणारे नव्हतेच. पुण्यातल्या पेन्सिल बनवण्याच्या कारखान्याचे मालक तात्यासाहेब मराठे यांनी सय्यदभाईंवर मुलासारखे प्रेम केले. धाकटी बहीण खतिजाला अचानक तोंडी तलाक मिळाल्याने ती घरी परतली आणि त्या क्षणी सय्यदभाईंसारख्या संवेदनशील माणसाच्या मनातली तळमळ तीव्र झाली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या प्रथेविरुद्ध काही तरी करायला हवे, म्हणून त्यांनी प्रयत्नांना सुरुवात केली. या त्यांच्या बंडाला त्यानंतरच्या २० वर्षांनी हमीद दलवाई या सुधारकाने जाहीर साथ दिली. आणि तोंडी तलाक हा विषय देशपातळीवर चर्चेत आला. १९७० मध्ये पुण्यात मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली आणि सय्यदभाईंच्या साऱ्या प्रयत्नांना या संघटनेच्या मदतीने प्रत्यक्ष रूप मिळाले. दलवाईंचे हे काम चर्चेत येत असतानाच त्यांचे निधन झाले. मंडळ संपले म्हणून त्या वेळी पेढे वाटणाऱ्यांना हे माहीत नव्हते, की सय्यदभाईंनी हा विषय आधीपासूनच हाताळायला सुरुवात केली आहे. भारतभर प्रवास करताना एकतर्फी तलाकचे बळी ठरलेल्या ठिकठिकाणच्या महिलांना भेटून त्यांच्या करुण कहाण्या ऐकून डोळय़ांतल्या आगीला करुणेचीही झालरही मिळाली, परंतु हा प्रश्न ऐरणीवर आणणे फार महत्त्वाचे असल्याने सय्यदभाईंनी कंबर कसली आणि समविचारी तरुणांच्या मदतीने तोंडी तलाक देणाऱ्या पुरुषांशी थेट चर्चा करायला सुरुवात केली. स्वाभाविकच समाजातून कमालीचा विरोध, धमक्या, जीव घेण्याचे प्रयत्न होऊ लागले. न डगमगता आपला लढा सुरू ठेवणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. प्रागतिक विचारांच्या अनेकांनी त्यांना मदत केली, माध्यमांनी या लढय़ाला समाजापुढे आणले आणि हा चार भिंतींच्या आडचा विषय निदान मुख्य प्रवाहातील चर्चेत तरी आला. मुस्लीम सत्यशोधक मंडळ हमीद दलवाईंच्याच तडफेने चालवण्याची हिंमत ते राखून होते. कारण घरात तलाक मिळाल्याने परत आलेल्या बहिणीच्या आयुष्यातील अंधार त्यांना डाचत होता. अशा किती तरी स्त्रिया अशाच कोठडीत निर्जीव जगणे जगत असल्याने, त्यांना मदतीचा हात देणे आणि शक्य तिथे पुन्हा घरी पाठवणे हे सय्यदभाईंच्या कामाचे स्वरूप. समाजाविरुद्ध जाऊन केल्या जाणाऱ्या कोणत्याही कृतीला होणारा जबरदस्त विरोध मोडून काढताना, त्यांच्या पाठीशी समाजातल्या महिला आणि पुरोगामी विचारांचे तरुण कार्यकर्ते होते. पोटापुरते पैसे मिळवण्यासाठी त्यांनी व्यवसाय सुरू केला, त्यालाही अनेक हितचिंतकांनी मदत केली, परंतु सय्यदभाईंचे सारे लक्ष समाजातील महिलांना न्याय कसा मिळवून देता येईल, याचकडेच होते. वय वाढत गेले, गात्रे शिथिल होत गेली, तरी धारदार नाकाच्या सय्यदभाईंच्या डोळय़ांतील अंगार आणि करुणा कमी झाली नाही. समाजातल्या मूठभरांचे नेतृत्व करणे, यात काय ती शोभा? हा त्यांचा नेहमीचा प्रश्न. महिलांची दारुण अवस्था दूर करायची तर पुरुषांमध्येही जाणीव जागृती व्हायला हवी, यासाठी त्यांचा सततचा प्रयत्न. सभा, मेळावे, विरोध, शिव्यांच्या लाखोल्या, जगण्यातील अस्थैर्य.. तरीही त्या दु:खाच्या डोंगरावरून कडेलोट होत असलेल्या महिलांच्या डोळय़ांतले अश्रू सय्यदभाईंच्या जगण्याची, लढण्याची खरी प्रेरणा होती. दगडावर शेती करून तिथे फुलांची बाग फुलवायचे त्यांचे स्वप्न होते. त्यांच्या निधनाने एक खरा आणि मनापासून काम करणारा सच्चा कार्यकर्ता हरपला आहे.
व्यक्तिवेध : सय्यदभाई
सुमारे ७५ वर्षांपूर्वी ‘सय्यद गायन पार्टी’चे कार्यक्रम गणेशोत्सवात सादर करणारे सय्यद महबूब शहा कादरी ऊर्फ सय्यदभाई हे पैशांअभावी शिक्षण सोडून नोकरीच्या मार्गाला लागले.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 09-04-2022 at 00:02 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaktivedh syed singing party program ganeshotsav regards teaching life ysh