कुठल्याही देशातील समाजाची घडण करण्यात तेथील सर्जनशील कलाकारांचा मोठा वाटा असतो, त्यात साहित्यिक, रंगकर्मी, संगीतकार यांनी चाकोरीबाहेर जाऊन दाखवलेले धैर्य महत्त्वाचे असते. पाकिस्तानसारख्या कर्मठ व धर्मसत्ताक देशात असे धाडस एखाद्या महिलेने दाखवणे हे तसे दुर्मीळ म्हणूनच गौरवास्पद. त्यामुळेच तेथील नाटककार, कलाकार व अजोका थिएटरच्या संस्थापिका असलेल्या मदिहा गौहर यांचे वेगळेपण सहज ठसणारे होते. अगदी सेन्सॉरशिपच्या काळात त्यांनी लाहोर येथे त्यांच्या घराच्या लॉनवर जुलूस नावाचे नाटक १९८४ मध्ये सादर केले. तेव्हापासून सुरू झालेला त्यांचा कलाप्रवास नुकताच संपला.
अर्थात त्यांना तरुणपणापासूनच कलेची आवड होती व कलासक्त मन त्यांना गप्प बसू देत नव्हते. त्यातूनच त्यांनी अजोका थिएटरच्या माध्यमातून पाकिस्तानात रंगभूमीची चळवळ सुरू केली. त्यात महिला हक्क, सामाजिक जागरूकता डोकावत होती. त्यामुळेच त्यांनी ऑनर किलिंग, स्त्री साक्षरता, मानवी हक्क अशा अनेक मुद्दय़ांवर नाटय़कलेच्या माध्यमातून प्रकाश टाकला. त्यांचा प्रेक्षकवर्ग हा वंचित लोकच होते. मोकळ्या मैदानात साकारणाऱ्या त्यांच्या नाटकांसाठी धरतीपासून आकाशापर्यंत मोठा पैस होता. त्यांचा जन्म १९५६ मध्ये कराचीत झाला. त्यांना सुरुवातीपासून कलेत रस होता. नाटय़ चळवळीत पाकिस्तानसारख्या देशात काम करण्याचे धाडस दाखवल्याने त्यांना नेदरलँड्सच्या राजदूतांनी ‘प्रिन्स क्लॉस’ पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. पाकिस्तान सरकारने त्यांना ‘तमघा ए इम्तियाझ’ हा सन्मान दिला. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान मैत्रीचा पुरस्कार करणाऱ्या कलावंतांपैकी त्या एक होत्या. त्यांच्या नाटकांमध्ये भारतीय कलाकारांचे सहकार्यही होते. तोबातेक सिंग, एक थी नानी, बुल्हा, लेटर्स टू अंकल सॅम, मेरा रंग दे बसंती चोला, दारा, कौन है ये गुस्ताख व लो फिर बसंत आयी अशी अनेक सरस नाटके त्यांच्या अजोका थिएटरने आणली. भारत, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, ओमान अशा अनेक देशांत त्यांचा हा नाटय़ प्रवास झाला. २००५ मध्ये त्यांचे नाव शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी पाठवण्यात आले होते. त्यांना या सगळ्या प्रवासात प्रवाहाविरोधात संघर्ष करावा लागला, पण त्यांनी सकारात्मकता सोडली नाही. लाहोरच्या रंगभूमी वर्तुळातील एक परिचित व प्रभावी कलाकार म्हणून त्यांचा करिश्मा होता. त्यांनी १९८४ मध्ये पाकिस्तानसारख्या देशात समांतर रंगभूमीची सुरू केलेली चळवळ हे त्यांचे मोठे योगदान. बुद्धिमान, सतत उत्साही व प्रभावी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वावर छाप पाडणारे होते. त्यांच्या रूपाने भारत-पाकिस्तान यांच्यातील शांतिदूत असलेल्या हरहुन्नरी कलावंतास आपण मुकलो आहोत.