सध्या सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका व बदल्यांचा वाद अधूनमधून डोके वर काढत असतो. सध्या हा संघर्ष न्यायव्यवस्था व सरकार यांनी वेगळ्या कारणाने तलवारी म्यान केल्याने थंडावलेला आहे, पण पूर्वीही असे वाद होत असत. पी. शिवशंकर हे कायदामंत्री असताना त्यांनी न्यायाधीशांच्या बदल्यांबाबत काढलेले एक परिपत्रक वादग्रस्त ठरले होते. त्यावर शिवशंकर यांनी न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य म्हणजे बाऊ करण्यासारखी गोष्ट नाही असे बेधडक उत्तर लोकसभेत दिले होते. त्यांचे ते परिपत्रक घटनाबाह्य़ नाही, कारण त्याला कुठलाही कायदेशीर आधारच नाही असा निकाल नंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात दिला होता. शिवशंकर हे गांधी घराण्याशी एकनिष्ठ होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसचा एक जुना निष्ठांवत काळाच्या पडद्याआड गेला आहे.

१९८० मध्ये इंदिरा गांधी सत्तेवर आल्या तेव्हा शिवशंकर कायदामंत्री झाले तेव्हा त्यांनी न्यायाधीशांच्या नेमणुकांत हस्तक्षेप केला. इंदिरा गांधी यांच्या विरोधक असलेल्या न्यायाधीशांना त्यांनी थारा दिला नाही, पण या हस्तक्षेपामागे राष्ट्रीय एकात्मता, निष्पक्षता, न्यायव्यवस्थेत उच्चवर्णीयांचा वरचष्मा संपवणे, न्यायाधीशांचे हितसंबंध निर्माण होऊ नयेत अशी अनेक कारणे त्यांनी दिली. १९८७ मध्ये केलेल्या एका भाषणात त्यांनी म्हटले होते, की सर्वोच्च न्यायालय हे समाजकंटक, फेरा कायदा उल्लंघन करणारे, वधूंना जाळणारे अशा अनेकविध लोकांसाठी स्वर्ग बनले आहे, त्यावर त्यांच्यावर बदनामीचा खटला भरला गेला, पण त्यात सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सुटका केली होती. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळात त्यांचा वरचष्मा होता. ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात न्यायाधीश होते, पण तेथून राजीनामा देऊन ते सर्वोच्च न्यायालयात वकिली करू लागले. नंतर राजकारणात आले.  १९७८ ते १९८० या काळात ते सिकंदराबादचे खासदार होते. १९८० मध्ये ते कायदामंत्री व नंतर पेट्रोलियममंत्री होते. असे म्हणतात, की महत्त्वाच्या बैठकांच्या वेळी इंदिरा गांधी शिवशंकर येण्याची वाट पाहत व नंतरच सुरुवात करीत. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर गांधी घराण्याचे नेतृत्व बाजूला सारण्याचा प्रयत्न झाला तेव्हा शिवशंकर यांनी राजीव गांधीच पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत असे सांगितले होते.  परराष्ट्र, मनुष्यबळ, व्यापार व नियोजन अशी इतर अनेक खाती त्यांनी सांभाळली. १९९८ मध्ये आंध्रमधील तेनाली मतदारसंघातून लोकसभेवर ते निवडून आले. सिक्कीम व केरळचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम केले. हैदराबाद जिल्हय़ात मामीडपल्ली येथे १९२९ मध्ये त्यांचा जन्म झाला. घरात ती एकूण अकरा भावंडे होती. शिवशंकर घरातून पळून गेले, पण अभ्यास पूर्ण करू शकले नाहीत. नंतर ते अमृतसरला पोहोचले. तेथे त्यांनी लाज न बाळगता बूटपॉलिशसह छोटी कामे करून शिक्षण पूर्ण केले. अमृतसरच्या हिंदू कॉलेजमधून त्यांनी बीए केले, तर हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून एलएल.बी. केले. हैदराबादच्या महापौरांचे व्यक्तिगत साहाय्यक बनले. त्यानंतर ते उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले.  एकेकाळी इंदिराजींचे उजवे हात असलेले शिवशंकर यांनी २००४ मध्ये निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षाने तिकिटे विकली असा आरोप करून पक्षाचा राजीनामा दिला, पण त्याची फारशी दखल पक्षाने घेतली नाही. नंतर अभिनेता चिरंजीवी यांच्या प्रजा राज्यम पक्षात गेलेले शिवशंकर पुन्हा काँग्रेसमध्ये आल्याने काँग्रेसवासीच झाले.