काही माणसांच्या आयुष्यात एखादी व्यक्ती अशी येते जिच्यामुळे तिचे सारे आयुष्यच बदलून जाते. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्य़ातील एका छोटय़ा गावातील मुलाच्या बाबतीतही असेच घडले. घरातील जनावरे दूरवर चरायला घेऊन जाणे व गुरे चरत असताना मिळेल ती पुस्तके वाचणे हा त्याचा छंद होता. एकदा बलियाचे जिल्हाधिकारी मेहदी हसन हे त्या भागाचा दौरा करीत होते. गावातील लोकांशी चर्चा करताना ते त्या मुलाजवळ आले. त्याच्याशी बोलताना हिंदी व उर्दू भाषेचे त्याचे ज्ञान बघून ते प्रभावित झाले. त्यांनी लगेच त्याच्या वडिलांना बोलावून घेतले व याला पुढे शिकण्यासाठी शहरात पाठवा, असा सल्ला त्यांनी दिला. त्या मुलाला मग अलाहाबाद येथे पाठवले गेले. या मुलाचे नाव होते दूधनाथ सिंह. हिंदीतील नामवंत कथाकार, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ते पुढे ओळखले गेले.
अलाहाबादला आत्याकडे राहत असताना सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला’ हे तिथेच राहत असत. दूधनाथ सिंह यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यांच्या सहवासामुळे त्यांच्यात वाङ्मयीन अभिरुची निर्माण झाली. बीएची पदवी घेतल्यानंतर खरे तर त्यांना उर्दूमध्ये एमए करायचे होते, पण त्याची प्रवेशाची तारीख निघून गेल्याने त्यांनी हिंदी साहित्यात एमए करायचे ठरवले. अलाहाबादमध्ये तेव्हा साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल असे. एकदा त्यांची धर्मवीर भारतींशी भेट झाली. एक कथा त्यांनी तेव्हा लिहिली होती. घाबरतच त्यांनी ती भारती यांच्याकडे दिली. भारती तेव्हा ‘कौमुदी’चे संपादक होते. त्यांनी त्यावर योग्य ते संस्कार करून ‘चौकोर छायाचित्र’ असे शीर्षक देऊन ती प्रसिद्ध केली. दूधनाथ सिंह यांचे कौतुक करून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही भारती यांनी केले. नंतर त्यांनी ‘सपाट चहरेवाला आदमी’ ही कथा लिहिली. ती ‘लहर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाल्यानंतर तिची समीक्षकांनी दखल घेतली. पुढे नोकरीनिमित्त ते कोलकाता येथे गेले. तेव्हा मोहन राकेश संपादक असलेल्या ‘सारिका’मध्ये त्यांची ‘बिस्तर’ ही कथा आली. सुमित्रानंदन पन्त यांनी ती कथा वाचल्यानंतर दूधनाथ सिंह यांना बोलावून घेतले. अलाहाबाद विद्यापीठात प्राध्यापक म्हणून येण्याची त्यांनी सूचना केली. ते पुन्हा अलाहाबादला आले आणि झपाटल्यागत लिहू लागले. साठोत्तरी काळात स्वातंत्र्यानंतर कोलमडून पडत जाणारी कुटुंबव्यवस्था, बदललेली मूल्ये, स्त्री-पुरुष संबंधांतील ताणतणाव, युवा पिढीचे शहरांकडे होत जाणारे स्थलांतर यांसारखे विषय साहित्यातून मांडले जाऊ लागले होते. दूधनाथ सिंहही त्याला अपवाद नव्हते. ‘आखरी कलाम’, ‘लौट आओ धार’, ‘यम गाथा’, ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’, ‘एक और आदमी भी है’, ‘सुरंग से लौटते हुए’ यांसारख्या त्यांच्या रचना हिंदी साहित्यात म्हणूनच कालजयी मानल्या जातात. दूधनाथ सिंह यांचा हिंदी कवितांचा दांडगा अभ्यास होता, पण त्यांनी स्वत: मात्र कविता फार लिहिल्या नाहीत. छोटासा प्रसंगही फुलवत नेण्याची त्यांची हातोटी विलक्षण असल्याने त्यांनी सर्वाधिक कथाच लिहिल्या. १९९४ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ लेखनाला वाहून घेतले. शिखर सम्मान, मैथिलीशरण गुप्त सम्मान असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले. त्यांच्या निधनाने समकालीन हिंदी साहित्यातील महत्त्वाचा कथाकार आपण गमावला आहे.